उरण । घन:श्याम कडू
उरण नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने पहिल्या फेरीतच घेतलेली प्रचंड आघाडी पाहताच सत्ताधाऱ्यांच्या तंबूत खळबळ उडाली आहे. पैशासाठी लोकशाही विकायला निघालेल्या काही मतदारांनी मागील निवडणुकीत केलेल्या बोगस मतदानाचा थेट हिशोब यंदा मागितला जाणार असून, अशा मतदारांना रंगेहाथ पकडून धडा शिकवण्याचा जाहीर इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. बोगस मतदार ओळखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आघाडीचे कार्यकर्ते सज्ज झाले असून, पैशाच्या हव्यासापोटी मतदान विकणाऱ्या मतदारांचे धाबे आधीच दणाणले आहेत.
उरण महाविकास आघाडीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उमेदवार भावनाताई घाणेकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या गलिच्छ कारस्थानांची पर्दाफाश करताच वातावरणच तापले. माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर व मनसेचे सतीश पाटील यांच्या उपस्थितीत भावनाताईंनी महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
पत्रकार परिषदेत बोलताना गणेश शिंदे यांनी प्रभागात किती बोगस मतदार आहेत, त्यांच्या हलवणीची खेळी कशी रचली गेली, या सर्वांचा सविस्तर तपशील मांडला. मतदार हेराफेरीत एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा थेट सहभाग असल्याचे सांगत “याची लवकरच संपूर्ण पोलखोल करणार,” असा थेट आणि तडक इशाराही त्यांनी दिला. बोगस व दुबार मतदारांविरोधात दाखल केलेल्या हरकती निवडणूक अधिकाऱ्यांकडूनच दुर्लक्षित झाल्याने आघाडीने निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेवरही कडवट सवाल उपस्थित केले.
उरणच्या नगरपरिषद हद्दीशी काहीही संबंध नसलेल्या ग्रामपंचायतीतील लोकांची नावे मतदारयादीत कशी घुसवली गेली? कोणत्या हातांनी हे सगळे खेळ जुळवले? आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा का केला? याबाबत आघाडीने तिखट रोष व्यक्त केला आहे. “बोगस मतदारांची संपूर्ण यादी दोन दिवसांत व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर जाहीर करू; मग जनतेसमोर कोणाचे पाप आणि कोणाची निष्ठा उघडी पडेल,” अशी कठोर भूमिका भावनाताई घाणेकर, मनोहरशेठ भोईर व गणेश शिंदे यांनी स्पष्ट शब्दात जाहीर केली. “सत्यमेव जयते! बोगस मतदारांवर कारवाई होणारच,” असा संदेश गोपाळ पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला देताना दिला.
यावेळी जाहीर झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात उरणला पारदर्शक, प्रामाणिक व नागरिकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार नोंदवला आहे. उरणच्या पाणीप्रश्नाची कायमस्वरूपी सुटका, सहा महिन्यांत खड्डेमुक्त रस्ते, चौकाचौकात सिग्नल, सीसीटीव्ही, स्वतंत्र पार्किंग, मच्छीमार बांधवांसाठी सुविधा, बाजारपेठेचे आधुनिकीकरण, मासळी साठवण सुविधा, नगरपालिका शाळांचे डिजिटल रूपांतर, स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रम अशा सर्वसमावेशक सुधारणा जाहीरनाम्यात समाविष्ट आहेत.
महिला आणि मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत एका कन्यारत्न असलेल्या कुटुंबांना दरमहा रुपये २५०० देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात भुमिपुत्रांच्या कुटुंबातील किमान एका व्यक्तीस नोकरीला प्राधान्य देण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. त्याचबरोबर अद्ययावत व्यायामशाळा, योगा सेंटर, उद्योग व पर्यटन विकास, सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन विकास आणि कोणत्याही अन्यायावर तात्काळ कारवाई करण्याचा निर्धारही महाविकास आघाडीने स्पष्ट केला आहे.
