बाजारात तीन धारी लिंबांना मागणी वाढली!
महाड | मिलिंद माने
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस एक डिसेंबर असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’ अशी म्हण होती. मात्र, आता तो काळ जाऊन “गुगल पे”चे दिवस आले असे म्हणण्याची वेळ आल्याचे चित्र नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान पाहण्यास मिळत असून त्याचबरोबर बाजारात तीन धारी लिंबांना मागणी वाढली असल्याचे चित्र देखील भाजीविक्रेतांकडून ऐकण्यास मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील पहिल्या टप्प्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. ३० नोव्हेंबर रोजी प्रचाराची सांगता होणार होती, मात्र अचानक निवडणूक आयोगाने प्रचाराची मुदत एक दिवसाने म्हणजे १ डिसेंबरपर्यंत . वाढविल्याने सर्वपक्षीय उमेदवारांना प्रचारासाठी एक दिवस वाढीव मिळाला आहे.
रायगड जिल्ह्यात महाड, श्रीवर्धन, रोहा, मुरुड, अलिबाग, पेण, उरण, खोपोली, कर्जत व माथेरान या १० नगर परिषदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील दहा नगरपरिषद क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले गेले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये. दिवसभर प्रचार केल्यानंतर उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी पूर्वी रात्रीच्या वेळेस छुप्या पद्धतीने मतदारांना भेटून आर्थिक प्रलोभन करण्याची प्रथा होती, मात्र शासकीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे उमेदवारांवर असलेली पाळत पाहता आता उमेदवारांनी मतदारांना “गुगल पे” करण्याची सोपी पद्धत अवलंबली असल्याचे चित्र असल्याची सर्वत्र चर्चा नगरपरिषद क्षेत्रामध्ये ऐकण्यास मिळत आहे
“तीन धारी लिंबू” ना वाढीव मागणी!
नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्याने व मतदारांना आर्थिक प्रलोभना बरोबरच रंगीत संगीत जेवणावळी देण्याबरोबरच मतदारांना भ्रमिष्ट करण्यासाठी बाजारात “तीन धारी लिंबू” शोधण्यासाठी उमेदवार जंग जंग पछाडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बाजारातील भाजीविक्रेत्यांकडे “तीन धारी लिंबू” प्राप्त करण्यासाठी भाजी विक्रेत्यांकडे जादा पैसे देऊन “तीन धारी लिंबू” विकत घेण्याची उमेदवारांची चढाओढ लागल्याचे चित्र देखील पहावयास मिळत आहे.
