महाड । प्रतिनिधी
महाड तालुक्यातील नाते गावात ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लीलावती राजाराम बलकावडे (वय ७६) यांचा मृतदेह काल सायंकाळी त्यांच्या घराशेजारी आढळून आला. त्यांच्या अंगावरील दागिने गायब असल्याने हा प्रकार चोरीच्या उद्देशाने झालेल्या खुनाकडे निर्देश करत आहे.
संध्याकाळच्या सुमारास गावकऱ्यांना लीलावती बलकावडे यांचा मृतदेह घराशेजारी दिसताच तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. महाड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
घटनास्थळी पाहणी करताना त्यांच्या शरीरावरचे दागिने नाहीसे झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे हा प्रकरण लुटीच्या उद्देशाने केलेल्या खुनाचा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
घटनेची तीव्रता लक्षात घेता फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल होऊन पुरावे गोळा करण्यात गुंतली. पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
या घटनेनंतर नाते गावासह महाड तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणांनी अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे.
