बोरी गावातील सभेत उसळला जनसागर; “विकास हवा असेल तर मत शिवसेनेलाच”, नागरिकांचा निर्धार
उरण । घन:श्याम कडू
उरण नगरपालिकेतील प्रभाग 3 व 4 या शिवसेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्याकडे सत्ताधारी भाजपने जाणीवपूर्वक पाठ फिरवून विकासकामे खुंटीवर टांगून ठेवल्याचा आरोप महाविकास आघाडीने बोरी गावातील जाहीर सभेत केला. रस्ते, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत गरजांकडे गेल्या अनेक वर्षांपासून ढिम्म दुर्लक्ष केल्यामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही भाजपपुरस्कृत अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने “विकासाला वाळीत टाकणार कोण?” असा सवाल नागरिकांनी सभागृहातून उपस्थित केला.

शिवसेनेचे कणखर नगरसेवक अतुल ठाकूर हे प्रभाग 3 व 4 च्या जनतेचे खरे जननायक म्हणून ओळखले जातात. कोणतीही समस्या उद्भवली तरी एक फोन केला की ते घटनास्थळी धाव घेऊन ती त्वरित मार्गी लावतात. या कामाचा वेग आणि सातत्य पाहता नागरिकांमध्ये “विकास हवा असेल तर मत अतुलदादांनाच” असा विश्वास अढळ आहे. भाजपने आमिषे, दबाव आणि विविध डावपेच रचून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला; मात्र अतुल ठाकूर यांनी शिवसेनेशी निष्ठा कायम ठेवत पक्षाची मान उंचावली.
बोरी गावातील महाविकास आघाडीच्या सभेला उसळलेल्या जनसागराने निवडणूक वातावरण ढवळून निघाले. गर्दीचा प्रचंड लोंढा पाहता अतुल ठाकूर आणि प्रमिला पवार यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. प्रभाग 3-4 मधील नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपला कडवट धडा शिकवण्याचा निर्धार केल्याचे सभेतील वातावरणावरून प्रकर्षाने दिसून आले.
सत्तेत असूनही भाजपच्या नगरसेवकाचा या प्रभागांत वारंवार पराभव होत असल्याने त्यांनी विकासकामांना जाणीवपूर्वक ब्रेक लावल्याचा आरोपही सभेत करण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर अचानक “विकास करू” असे सांगणारे उमेदवार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका करण्यात आली. कधीच न दिसणारे, सामाजिक कामात शून्य सहभाग असलेले उमेदवार लादण्याचा भाजपचा प्रयत्न सुज्ञ मतदारांना रुचत नाही, असा सूर वक्त्यांनी व्यक्त केला.
सभेत अतुल ठाकूर यांच्या आजवर केलेल्या विकासकामांची पुस्तिका सादर करण्यात आली. त्यात रस्ते, पाणीपुरवठा, नाली, स्वच्छता, नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवणे, तातडीची कामे त्वरित मार्गी लावणे अशा त्यांच्या उल्लेखनीय कामांचा आढावा देण्यात आला. ही पुस्तिका पाहताच विरोधकांची बोलती बंद झाल्याचे दृश्य सभागृहात पाहायला मिळाले. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता लोकसेवा करणारे संतोष पवार यांच्या सामाजिक वारशातून उमेदवारी मिळालेल्या प्रमिला पवार यांनीही विकासासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीने भावना घाणेकर यांची निवड केली आहे. सिडको, जेएनपीटी, नगरपालिका आणि प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात नेहमी अग्रस्थानी राहणाऱ्या या रणरागिणींची निवड जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरली. तर भाजपने स्वतःच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना डावलून, कधीच राजकारणात नसलेल्या व्यक्तीच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याची टीका सभेत झाली.
