उरण वाहतूक पोलिसांकडून शहरात गस्त वाढली; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे ‘प्रबोधन’
उरण । अनंत नारंगीकर
उरण नगरपालिका निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच वाढत्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उरण वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अचानक वाढलेल्या वर्दळीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गस्तीत मोठी वाढ केली असून, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईसोबतच विशेष प्रबोधनात्मक सत्रे आयोजित केली आहेत.
उरण वाहतूक पोलिसांनी यावेळी केवळ दंड न आकारता, वाहनचालकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देत, सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ (दारू पिऊन वाहन चालवणे) पूर्णपणे टाळावे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, रस्त्यावर कुठेही वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशा सुचना पोलिसांनी दिल्या.

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याच्या ‘मानवतावादी’ भूमिकेवर विशेष भर दिला. अपघातानंतरचा पहिला तास किती महत्त्वाचा आहे, हे समजावून सांगण्यात आले. अपघातग्रस्त जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात घेऊन जावे. अपघाताची माहिती त्वरित पोलीस यंत्रणेला द्यावी: यासाठी १०० किंवा ११२ या क्रमांकावर फोन करावा. जवळच्या वाहतूक चौकीला/पोलीस स्टेशनला कळवावे. रुग्णवाहिका बोलावण्यासाठी १०८ किंवा १०३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.सर्वांनी आपली वाहने ‘सावकाश’ चालवून इतरांचा आणि स्वतःचा जीव सुरक्षित ठेवावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
उरण शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांच्या परिसरामध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, निवडणुकीपूर्वी आणि नंतरही शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे स्वयंस्फूर्तीने पालन करावे. हे अभियान यापुढेही कठोरपणे सुरू राहणार असल्याचे उरण वाहतूक पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी स्पष्ट केले आहे.
