दत्तयात्रा उंबरठ्यावर… भक्तांचा प्रशासनाला जाब : “चोर दिसले, तरी पकडले गेले नाहीत, तपास कोणत्या दिशेला?”
रेवदंडा | सचिन मयेकर
सुमारे १६० वर्षांचा इतिहास, हजारो भक्तांची अपरंपार श्रद्धा आणि ७०० पायऱ्यांवर वसलेले दिव्य दत्तस्थान अशा चौल–भोवाळे दत्तमंदिरातून तब्बल ४० किलो चांदी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. परंतु आजही या प्रकरणाचा तपास निष्फळ ठरला असून चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. दत्तयात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असताना या प्रकरणातील दिरंगाईमुळे भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

जत्रा संपली…पाहणीत चांदी गायब
११ डिसेंबरला पाच दिवसांची दत्तजत्रा पार पडली. लाखो भाविकांच्या गर्दीनंतर मंदिर समितीने नियमित पाहणी केली असता गाभाऱ्यातील चांदीचे सुमारे ४० किलो वजनाचे साहित्य गायब असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार समजताच चौल–भोवाळे परिसरात एकच खळबळ उडाली.
फुटेजमध्ये चोर स्पष्ट दिसले, तरीही तपास शून्य

मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरटे स्पष्ट दिसत असून त्यांनी कोणत्या दिशेने प्रवेश केला, कसे फिरले, कोणत्या मार्गाने बाहेर गेले याचे तपशीलही कैद झाले आहेत. चोरांच्या हालचाली इतक्या स्पष्टपणे नोंदल्या गेल्या की हा प्रसंग जणू सिनेमातील सस्पेन्स दृश्यासारखा वाटावा.
चोर दिसले… पण पकडले गेले नाहीत! हे भक्तांच्या संतापाचे मुख्य कारण बनले आहे.
तपासाची फाइल तीन वर्षांपासून धुळ खात
घटनेनंतर रायगड जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हेअन्वेषण पथकाला तपास सोपवला गेला. त्यानंतर विशेष पथक, स्थानिक ठाणे, तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही माहिती गोळा करण्यात आली. परंतु, चांदी कुठे गेली?, चोर कोण होते?, सीसीटीव्हीत चेहरा दिसत असूनही ओळख का पटली नाही?, स्क्रॅप मार्केट, चांदी व्यापारी यांची चौकशी का निष्फळ? या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे अद्याप प्रशासनाकडे नाहीत.

“हा तपास आहे की थट्टा?” : भक्तांचा संताप
दत्तमंदिरातून ४० किलो चांदी चोरीला जाऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला; मात्र तपासाचा ठावठिकाणा न लागल्याने भाविक संतापले आहेत. “चोर सापडत नाहीत म्हणजे तपास कोणत्या दिशेला चाललाय? सीसीटीव्हीत चोर दिसत असताना तीन वर्षे तपास अडकून राहतो म्हणजे हे भक्तांची थट्टा नाही का?” असा सवाल करीत भक्तांनी संताप व्यक्त केला आहे.
गाभाऱ्यात बूट घालून घुसलेले चोर अजूनही मोकाट
गाभाऱ्यात पायात बूट घालून आत शिरलेल्या चोरट्यांचा अपमानकारक, निर्लज्ज व्यवहार आजही भाविकांच्या मनाला चटका लावतो. मंदिर समिती आणि भक्तांनी चोरट्यांना लवकर पकडण्याची मागणी वारंवार केली, पण तपास ‘जैसे थे’ अवस्थेतच आहे.
दत्तयात्रा पुन्हा उंबरठ्यावर…सुरक्षा कुठे?
काही दिवसांतच चौल–भोवाळ्याची दत्तयात्रा सुरू होणार असून लाखो भाविक आगमनाची तयारी करत आहेत. मात्र मंदिरात झालेल्या धाडसी चोरीची उकल न झाल्याने व सुरक्षा यंत्रणांची कमी दक्षता पाहता भाविकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
दत्तयात्रेपूर्वी तपासात वेग आणणे, चोरट्यांची ओळख पटवणे, मंदिर परिसरात कडक सुरक्षा, सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करणे या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर धडकल्या आहेत.
दत्तमंदिरातून ४० किलो चांदीची सिने–स्टाईल चोरी… चोर कॅमेऱ्यात दिसतात, पण तीन वर्षांनंतरही पकडले जात नाहीत, हा प्रश्न आता रायगड पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे.
