अवैध दारूगुत्त्यावर छापा; २१ जण ताब्यात, ७,१७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पेण | विनायक पाटील
पेण तालुक्यातील धावटे परिसरातील स्पाईस हॉटेलमध्ये अवैध दारूचे सेवन सुरू असल्याची मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार पेण पोलिसांनी २९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास धडक कारवाई केली. पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने अचानक छापा टाकताच हॉटेलमध्ये कोणताही परवाना नसताना दारूचा गुत्ता सुरू असल्याचे उघड झाले.
कारवाईदरम्यान जवळपास २१ जण वेगवेगळ्या टेबलांवर बसून दारूचे सेवन करताना आढळले. त्याठिकाणी दारूच्या बाटल्या, चाकणा, ग्लास, चमचे, टेबल असे एकूण ७,१७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या मोहीमेनेच ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. रायगडभरातील अवैध दारू विक्रीवर पोलीस प्रशासनाने कडाडून कारवाई सुरू केल्याने संबंधितांनी गोंधळ उडाला असून धावटे येथील कारवाईमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील पुढील तपास पेण पोलीस करत असून अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
