क्रीडा प्रतिनिधी
रायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाखालील मुलांच्या ४० षटकांच्या एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट अकॅडमी, कामोठे यांनी दमदार खेळ साकारत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीत त्यांनी प्रतिक क्रिकेट अकॅडमी, पनवेल संघावर एकतर्फी विजय नोंदवला.
उपांत्य लढतीत प्रथम फलंदाजी करताना प्रतिक क्रिकेट अकॅडमीचा डाव केवळ ३९ धावांवर ३५.४ षटकांत आटोपला. यजुर्व घरतने १३ धावा केल्या मात्र इतर कोणताही फलंदाज दुहेरी अंकात पोहोचू शकला नाही. रोशन क्रिकेट अकॅडमीच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत प्रतिस्पर्ध्यांना नमवत निर्णायक आघाडी घेतली. निखिल अहिरवालने सर्वोच्च ४ बळी घेतले, तर समर्थ यादवने ३ आणि आर्यन गाडेने २ बळी घेत पनवेलची दाणादाण उडवली.
अवघ्या ४० धावांचे साधे लक्ष्य पाठलागासाठी उतरलेल्या रोशन क्रिकेट अकॅडमीने १२.५ षटकांत २ गडी गमावत विजय मिळवला. यात मीत पाटीलने नाबाद १४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. पनवेलकडून अधिराज जाधवने एकमेव बळी घेतला.
संघाचे प्रशिक्षक रोशन अडे यांनी आपल्या खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले असून अंतिम सामन्यासाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. रोशन क्रिकेट अकॅडमीचा अंतिम सामना जगदीश क्रिकेट अकॅडमी, अलिबागविरुद्ध होणार आहे.
