• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणची सत्ता कोणाच्या हाती? 26 हजार मतदार ठरवणार नगराध्यक्ष–नगरसेवकांचं भवितव्य!

ByEditor

Dec 1, 2025

उरण । घन:श्याम कडू
उरण नगरपालिकेच्या सत्तेसाठीची निर्णायक लढत आता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण शहरात राजकीय तापमान प्रचंड वाढले असून, उद्याच्या मतदानानंतर कोणत्या पक्षाचा झेंडा नगरपालिका इमारतीवर फडकणार, याकडे सर्व उरणकरांचे डोळे लागले आहेत.

उरण नगरपालिकेतील एकूण 10 प्रभागांतून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षा अशा एकूण 22 पदांसाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षा पद महिला राखीव असल्याने सर्व पक्षांच्या गणितात मोठी उलथापालथ झाली. योग्य महिला उमेदवारांच्या शोधासाठी पक्षांना धावाधाव करावी लागली. या निवडणुकीत 13,311 पुरुष आणि 12,903 महिला असे मिळून 26,214 मतदार आपले मतदान करून भविष्यातील नगरपालिका नेतृत्व ठरवणार आहेत.

नगराध्यक्षा पद हे जनतेकडून थेट निवडून द्यायचे असल्याने मुख्य लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. महाविकास आघाडीतर्फे भावना घाणेकर या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर मैदानात आहेत, तर भाजपतर्फे शोभा कोळी या कमळ या चिन्हावर उमेदवारी करत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या रुपाली ठाकूर हे धनुष्यबाण या निशाणीवर आणि एक अपक्षही रिंगणात असले तरी खरी लढत भावना घाणेकर व शोभा कोळी यांच्यातच रंगणार असल्याचे चित्र आहे. उरणकरांच्या नजरा या दोन्ही महिला उमेदवारांच्या विजयाकडे खिळल्या आहेत.

नगरसेवकांच्या 21 जागांवर महाविकास आघाडी व भाजप यातच मुख्य सामना होणार आहे. प्रभागनिहाय मतदारसंख्या पाहता प्रभाग 1 ते 9 मधून प्रत्येकी 2 नगरसेवक, तर प्रभाग 10 मधून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत.

प्रभागनिहाय मतदारसंख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक 1 मध्ये पुरुष 1605, महिला 1706 एकूण 3311, प्रभाग 2 मध्ये पुरुष 1549, महिला 1613 एकूण 3162, प्रभाग 3 मध्ये पुरुष 1252, महिला 1168 एकूण 2420, प्रभाग 4 मध्ये पुरुष 1416, महिला 1321 एकूण 2737, प्रभाग 5 मध्ये पुरुष 1298, महिला 1268 एकूण 2566, प्रभाग 6 मध्ये पुरुष 1010, महिला 1049 एकूण 2059, प्रभाग 7 मध्ये पुरुष 1566, महिला 1388 एकूण 2954, प्रभाग 8 मध्ये पुरुष 955, महिला 893 एकूण 1848, प्रभाग 9 मध्ये पुरुष 1148, महिला 1145 एकूण 2293 आणि प्रभाग 10 मध्ये पुरुष 1512, महिला 1352 एकूण 2864 अशी मतदारांची आकडेवारी आहे. या सर्व प्रभागांमध्ये चुरशीची लढत होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.

मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होत असून बुधवार, दि. 3 डिसेंबर रोजी नगरपालिका कार्यालयात निकाल जाहीर केला जाणार आहे. केवळ काही तासांत उरण नगरपालिकेच्या सत्तेचा तख्ता कोणाच्या बाजूने झुकणार, हे स्पष्ट होणार आहे.

मागील निवडणुकीतील सत्तासंतुलन लक्षात घेता यंदाची निवडणूक अधिक तापलेली आणि चुरशीची होणार हे आधीच स्पष्ट झाले आहे. नेतेमंडळी गोटे मांडून सज्ज झाली आहेत. मतदारांच्या मनात बदलाची अपेक्षा, नाराजी, विकासाच्या मागण्या सगळंच एका क्षणात मतदानयंत्रावर उमटणार आहे.

उरणकरांच्या बोटावर आता संपूर्ण शहराचे भवितव्य अवलंबून आहे. ही निवडणूक फक्त सत्तेची नव्हे, तर उरणच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचा दिशा ठरवणारी ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!