श्रीवर्धन : अंधश्रद्धेचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची एक अत्यंत संतापजनक घटना रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून समोर आली आहे. एका नराधम मांत्रिकाने ‘अंगातून भूत काढतो’ असे सांगून मुलीच्या कुटुंबाचा विश्वासघात केला आणि तिच्यावर बलात्कार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीने पीडित मुलीच्या आईचा विश्वास संपादन केला. उपचारासाठी म्हणून त्याने मुलीला आणि तिच्या आईला स्वतःच्या गाडीतून श्रीवर्धन येथे आणले. 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन येथे पोहोचल्यावर, आरोपीने मुलीच्या आईला जाणीवपूर्वक समुद्रकिनाऱ्यावर थांबण्यास सांगितले.
आईला बाजूला केल्यानंतर, नराधम आरोपीने अल्पवयीन मुलीला एकटी पाहून तिच्यावर बलात्कार केला. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीने घरी जाऊन कुटुंबाला घडलेला सर्व प्रकार सांगितला.
कुटुंबीयांनी या क्रूर घटनेची गंभीर दखल घेत तातडीने श्रीवर्धन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरुद्ध कठोर फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम’ (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन सविता गर्जे करीत आहेत.
