नागपूर : राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत असून या निवडणुकांचा निकाल उद्या जाहीर होणार होता. मात्र काही नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने आता निवडणूक निकालही पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा कोर्टात अपील प्रलंबित असलेल्या किंवा नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळालेल्या ठिकाणी निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर 21 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या सर्व नगरपरिषद-नगरपंचायतींचे निकाल जाहीर होतील.राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार, ज्या ठिकाणी जिल्हा कोर्टात अपील सुरू आहे किंवा जिथे अपिलांचा निकाल लागण्यास उशीर झाला आणि उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी फक्त तीन दिवसांचाच अवधी मिळाला, अशा सर्व ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
