श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यातील मेघरे गाव परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. गावाजवळील डोंगराळ पट्टा आणि झाडीभागात अचानक बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी शेतात काम करणाऱ्या काही नागरिकांनी बिबट्या पाहिल्याचे सांगताच ही बातमी क्षणात गावभर पसरली.
घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून लहान मुलांना घराबाहेर न सोडण्याचे आणि रात्रीच्या वेळी अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत तातडीने वनविभागाला माहिती देण्यात आली असून पथकाने परिसराचा दौरा केला आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ट्रॅपची तयारी सुरू असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता सावध राहण्याचे तसेच वनविभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेघरे गाव परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.
