उरण, दि. ५ (विठ्ठल ममताबादे) : उरण–नेरुळ आणि उरण–बेलापूर लोकल मार्गांवरील फेऱ्या वाढविण्याची प्रवाशी, नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्थांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी अखेर मान्य झाली आहे. वाढीव रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी आमदार महेश बालदी आणि भाजप युवा नेते प्रितम म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना आता यश मिळाले असून प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नेरुळ–उरण–नेरुळच्या ४ अतिरिक्त फेऱ्या आणि बेलापूर–उरण–बेलापूरच्या ६ अतिरिक्त फेऱ्यांना मंजुरी दिली आहे. यासोबतच तरघर आणि गव्हाण येथे नवीन स्टेशनांचीही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.
या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी उरण–नेरुळ रेल्वे फेऱ्यांत वाढ करून जनहिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. लाखो प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरेल.”
दरम्यान, फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाची भावना असली तरी पहाटेच्या व उशिरापर्यंतच्या सेवांची कमतरता अद्यापही कायम असल्याचे मत रेल्वे प्रवासी व्यक्त करत आहेत.
“फेऱ्या वाढल्या हे चांगलं झालं, पण उरणवरून नेरुळ–बेलापूरकडे पहाटे ५ वाजता पहिली लोकल सुरू व्हावी आणि नेरुळ व बेलापूरवरून उरणला येण्यासाठी रात्री ११ वाजता शेवटची ट्रेन असावी. सध्या या वेळांच्या फेऱ्या नसल्याने प्रवाशांचे खूप हाल होत आहेत.”
-हर्षल म्हात्रे,
रेल्वे प्रवासी, उरण.
फेऱ्यांवरील वाढीचा निर्णय स्वागतार्ह असला तरी पहाटे–उशिरा रात्रीच्या सेवांची अंमलबजावणी हीच आता प्रवाशांची प्रमुख अपेक्षा बनली आहे.
