माणगाव । सलीम शेख
माणगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तळाशेत हद्दीतील कशेणे गावातील अनेक नागरिकांची घरे ही वर्षानुवर्षे सरकारी गुरचरणात (गुरुचरण) असल्याने शासकीय कागदपत्रे, नोंदणी, प्रमाणपत्रे आदी कामांमध्ये त्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. आपलीच घरजमीन असूनही ती अधिकृत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा–महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘सर्वांसाठी घरे’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. ३१ डिसेंबर २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर उभारलेली निवासी घरे नियमबद्ध करण्यासाठी शासनाने अध्यादेश जारी करून लाखो नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
या अध्यादेशाच्या अनुषंगाने कशेणे गावातील घरांचे नियमितीकरण करण्यासाठी भाजपाचे युवक जिल्हाध्यक्ष व महायुतीचे युवानेते निलेश थोरे यांनी पुढाकार घेतला आहे. देवेंद्र मुंढे यांच्यासह त्यांनी सर्व लाभार्थी ग्रामस्थांना घेऊन उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, नायब तहसीलदार विपुल ढुमे, माणगाव पंचायत समितीच्या बीडीओ शुभदा पाटील-कुलकर्णी, अतिरिक्त बीडीओ जाधव, भूमी अभिलेख अधिकारी संजय जावरे तसेच तळाशेत ग्रामपंचायत प्रशासक गोल्हार यांची भेट घेतली.
या भेटीत कशेणे येथील सर्व घरधारकांची घरे शासन अध्यादेशानुसार नियमित करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. यावर प्रांताधिकारी डॉ. सानप यांनी संपूर्ण माहिती घेत तात्काळ प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना बीडीओंना दिल्या.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार असून हजारो नागरिकांना अधिकृत घराचा दिलासा मिळणार आहे, असे देवेंद्र मुंढे यांनी सांगितले.
दरम्यान, “सदर प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करू. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयाचा लाभ आणि महायुती सरकारच्या सर्व योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गरज भासल्यास मंत्री बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही ग्रामस्थांना न्याय मिळवून देऊ,” असे आश्वासन युवानेते निलेश थोरे यांनी दिले.
