जमाव शांत करण्यासाठी पोलिसांची शर्थ
नागोठणे । महेंद्र म्हात्रे
दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी संभे गाव हद्दीतील रोहा–कोलाड रोडवर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. मोटरसायकल (क्रमांक MH-06/BJ-3318) व स्कुटी (क्रमांक MH-06/CB-3701) हे दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने समोरासमोर धडक झाली.
अपघातानंतर मोटरसायकल चालक व स्कुटी चालक यांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, कोलाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. मृतांमध्ये दिनेश भिकू पवार (३४, रा. विठ्ठलनगर-रातवड, माणगाव) व जावीर इब्राहिम शाह (रा. धाटाव, ता. रोहा, मूळ उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. त्यांच्या मृतदेहांचे उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे शवविच्छेदन करण्यात आले.
स्कुटीवरील पाठीमागे बसलेले दोघे प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 135/2025 नोंदवण्यात आला असून भा.न्या.सं. कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 128/177 व 184 अंतर्गत पुढील तपास सुरू आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोजकर हे स.पो.नि. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
जमाव संतप्त, पोलिसांनी केली शांतता प्रस्थापित
मृतांपैकी दिनेश पवार हे माणगाव तालुक्यातील असल्याने अपघाताची माहिती मिळताच ३५० ते ४०० नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र, कोलाड येथे मोठ्या संख्येने जमले. तत्काळ कारवाईची मागणी करत परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
घटनास्थळी पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कार्यभार असलेले स.पो.नि. सचिन कुलकर्णी यांनी पथकासह धाव घेत जमावाला शांत केले. कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती देत सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. परिणामी परिस्थिती नियंत्रणात आली.
