पहेल–खांडपाले बायपासचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
माणगाव । सलीम शेख
मुंबई–गोवा महामार्गाचे रखडलेले काम, निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाढते अपघात आणि प्रशासनाचे उदासीन भूमिकेमुळे ग्रामस्थांचा संताप आज पुन्हा एकदा रस्त्यावर उसळला. जन आक्रोश समितीच्या वतीने ६ डिसेंबर रोजी लोणेरे पुलावरून काढण्यात आलेल्या तिरडी यात्रेला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
लोणेरे, नवघर, उसरघर, वडपाले, टेमपाले या गावांतील रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रखडलेल्या कामाचा निषेध नोंदविला. वर्षानुवर्षे चाललेल्या दिरंगाईला नागरिकांनी “अति झाला उपद्व्याप” असे म्हणत तीव्र शब्दांत निषेध केला.
“दररोजचा मृत्यूमार्ग”
या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेला पहेल–खांडपाले बायपास आजही अपूर्ण पडून राहिलेला आहे. चारही बाजूने वाहतूक सुरू होण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात फक्त एकाच बाजूचा रस्ता सुरू असून उर्वरित बाजू अद्याप कच्च्याच अवस्थेत आहेत. त्यामुळे शाळा–कॉलेज विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली.
भरधाव ट्रक व अवजड वाहनांमुळे अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामस्थांनी या मार्गाला “दररोजचा मृत्यूमार्ग” असे संबोधत तीव्र रोष व्यक्त केला.
“बायपासचे काम तातडीने सुरू करा”
आंदोलनात विशाल टेंबे, प्रभाकर ढेपे, संतोष शिंदे, शिवाजी टेंबे, हरीभाऊ शिंदे, राहुल बरे, ज्ञानेश्वर शिगवण, घाडगे सर, मंगेश वाघोस्कर, महेश खराडे, संजय वाघोस्कर, रामदास खराडे, सुनील खराडे, नारायण केसरकर, मुकेश शिंदे यांच्यासह दोन्ही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“बायपासचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा मोठ्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
तिरडी यात्रेतून प्रतीकात्मक संदेश
अनेक वर्षांपासून मुंबई–गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. यंत्रणा बदलल्या, कंत्राटदार बदलले, आश्वासने बदलली; मात्र रस्त्यांची अवस्था जसंच्या तसं कायम असल्याचा आरोप करण्यात आला. खराब रस्ते, खड्डे, धोकादायक वळणे आणि अधुरे सर्व्हिस रोड यामुळे प्रवाशांचा प्रवास धोकादायक ठरल्याचे नागरिकांनी सांगितले.
अपघातांची मालिका थांबता थांबेना, त्यामुळे तिरडी यात्रेद्वारे “जीव धोक्यात घालण्याची वेळ आमच्यावर आली तर आमचा संघर्षही तीव्र असेल,” असा इशारा देण्यात आला. “ही तिरडी आमच्या वेदनेची निशाणी आहे,” अशा शब्दांत नागरिकांनी शासनाच्या निष्क्रियतेवर प्रहार केला.
“रस्ता नाही, सुरक्षितता नाही, मग विकास कसला?”
महामार्गाच्या मध्यभागी प्रतीकात्मक तिरडी ठेवून सरकार आणि प्रशासन जागे होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. “या महामार्गावर कधीही मोठा अपघात होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल,” असे नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले.
मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत शासनाने आता तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
