प्रवासी, नागरिक आणि पोलिस हैराण, लांबच लांब वाहनांच्या रांगा
माणगाव । सलीम शेख
मुंबई–गोवा महामार्गाचे काम अद्यापही पूर्णत्वास न गेल्याने तसेच माणगाव आणि इंदापूर येथील बायपास मार्ग सुरू न झाल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. माणगाव, इंदापूर आणि लोणेरे शहरांमध्ये वाहनांची प्रचंड गर्दी होत असून त्याचा प्रचंड फटका प्रवासी, नागरिक आणि पोलिसांना बसत आहे. सततच्या कोंडीमुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः हैराण झाली आहे.
शनिवार, दि. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी, लग्नसमारंभांची संख्या, शासकीय कार्यालये तसेच शाळा–कॉलेज बंद असल्याने दिवसभर वाहनांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळाली. परिणामी माणगाव शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यातील कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी विविध पर्यायी रस्त्यांचा व शॉर्टकट मार्गांचा अवलंब केला. त्यामुळे खरवली, निजामपूर, रायगड रोड, बामणोली, मोरबा, दहिवली, गोरेगाव आदी भागातील अरुंद रस्त्यांवरही वाहनांची मोठी गर्दी झाली. नेहमीपेक्षा चारपट वाहतूक वाढल्याने या परिसरातील नागरिकांचाही त्रास अधिक वाढला. कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिस कर्मचारी दिवसभर रस्त्यावर तैनात राहून अथक परिश्रम घेत होते. मात्र उपलब्ध पोलीस कर्मचारी अपुरे असल्याने काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे थांबली तर काही ठिकाणी वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत वाढल्या. यामुळे पोलिसांवरही प्रचंड मानसिक ताण निर्माण होत आहे.
सुट्टीच्या दिवशी आणि गर्दीच्या काळात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त वाढवावा, वाहतूक नियोजनात सुधारणा करावी आणि लवकरात लवकर बायपास मार्ग सुरू करण्याची मागणी स्थानिकांतून जोर धरत आहे. महामार्गाचे काम मार्गी न लागल्यास ही समस्या आणखी तीव्र होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
