• Mon. Dec 15th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ना. गोगावले यांच्या बदनामी प्रकरणी शिवसैनिक आक्रमक; चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात श्रीवर्धनमध्ये ‘जोडे मारो’ आंदोलन

ByEditor

Dec 11, 2025

श्रीवर्धन बंदचा शिवसैनिकांचा इशारा; बनावट व्हिडीओद्वारे बदनामी केल्याचा आरोप

श्रीवर्धन । अनिकेत मोहित
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि गोरगरिबांचे कैवारी ना. भरतशेठ गोगावले यांची बनावट व्हिडीओद्वारे बदनामी केल्याचा आरोप करत, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे आज (दि. ११) श्रीवर्धन येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या शिवसैनिकांनी पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून तीव्र संताप व्यक्त केला.

ना. भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात खोटा व्हिडीओ बनवून योजनाबद्ध पद्धतीने त्यांची बदनामी करण्याचा डाव आखल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे. या निषेधार्थ आयोजित आंदोलनात श्रीवर्धन तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

या प्रसंगी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर यांनी विरोधकांना कडक शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, “ना. भरतशेठ गोगावले यांच्यावर अशाप्रकारे खोटे आरोप करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. भविष्यात असा कोणताही खोडसाळ प्रयत्न झाल्यास आम्ही ‘श्रीवर्धन बंद’ची हाक देऊ.”

या आंदोलनामध्ये शिवसेना तालुका प्रमुख सुरेश मिरगळ, उपतालुका प्रमुख ओमकार शेलार, शहर प्रमुख सावन तवसाळकर, प्रजोत नांदवीडकर, महिला आघाडी शहर अध्यक्षा सुप्रिया करदेकर, युवासेना शहर प्रमुख अजय चव्हाण आणि सलोनी मोहित यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“ज्या शेतकरी कामगार पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी एकेकाळी खासदार सुनील तटकरे यांच्यावर बैलगाडीभर भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचे सांगत आंदोलन करण्याचे नाटक केले होते, त्याच पक्षाच्या चित्रलेखा पाटील आज तटकरे यांचे गुणगान गात आहेत. हा विरोधाभास म्हणजे त्यांच्या ‘सुपारीखोर’ राजकारणाचा भाग आहे. ना. भरतशेठ गोगावले यांच्यावर केलेले बिनबुडाचे आरोप ही त्यांच्या राजकीय दिवाळखोरीची पराकाष्ठा असून, शिवसेना शहर संघटना याचा तीव्र निषेध करत आहे.”
– सावन तवसाळकर
(शिवसेना शहर प्रमुख, श्रीवर्धन)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!