पोलीस पाटलांच्या मानधनावर कनिष्ठ लिपिकाचा डल्ला; चौघांविरोधात गुन्हा दाखल
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारानंतर आता थेट रायगड पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. पोलीस मुख्यालयातील लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ लिपिकाने बनावट नावे आणि कागदपत्रांचा आधार घेत तब्बल १ कोटी ७८ लाख २९ हजार ३०० रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कनिष्ठ लिपिकासह चौघांविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका घोटाळा कसा झाला?
पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेत राजेश राम जाधव हा कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता. त्याने २०२१ पासून ते आजतागायत या भ्रष्टाचाराचे जाळे विणले. बनावट देयके (बिले) तयार करणे: जाधव याने जिल्ह्यातील पोलीस पाटलांची यादी तयार केली आणि त्यात प्रत्यक्ष हजर नसलेल्या पोलीस पाटलांची बनावट नावे समाविष्ट केली. कोषागारातून रक्कम काढणे: बनावट यादीच्या आधारे मानधनाची मंजुरी कोषागारातून (Treasury) प्राप्त करून घेतली.
मानधनाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर पुन्हा या यादीत फेरफार करून दुसरी बनावट यादी तयार केली. या यादीच्या आधारावर त्याने स्वतःच्या नावावर ७२ लाख ३२ हजार ५०० रुपये काढले. तसेच, रिया राजेश जाधव या पोलीस पाटील नसतानाही, त्यांच्या नावाचा मुदतवाढीचा खोटा दाखला बनवून त्यांच्या नावाने १ कोटी ५ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम कोषागारातून काढली.
या संपूर्ण प्रक्रियेतून त्याने शासकीय रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला, ज्यात एकूण १ कोटी ७८ लाख २९ हजार ३०० रुपये इतका मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. ही रक्कम स्वतःच्या आणि इतर अशासकीय व्यक्तींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. तपासामध्ये काही सक्रिय पोलीस पाटलांच्या खात्यातही मानधनाची रक्कम दुबारपेक्षा अधिक वेळा जमा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हा दाखल
या गंभीर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी राजेश जाधव, रिया जाधव आणि इतर दोन अशा एकूण चार जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
