मृत्यूचे कारण अस्पष्ट; परिसरात शोककळा
महाड | मिलिंद माने
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी अलिबाग येथून आलेल्या एका नववीतील विद्यार्थिनीचा महाड येथे कार्यक्रमादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली आहे. निधी समीर म्हात्रे (रा. शहाबाज, ता. अलिबाग) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले असून, तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नेमकी घटना काय?
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने १२ आणि १३ डिसेंबर या दोन दिवसांसाठी महाड येथील चांदे क्रीडांगणावर विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्याभरातील कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी महाड येथे दाखल झाले होते.
यामध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी शहाबाज हायस्कूलमध्ये नववीत शिकणारी निधी म्हात्रे ही विद्यार्थिनीही आली होती. आज दुपारपासून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुरू होता. समारंभात बक्षीस स्वीकारून परत येत असताना, निधीला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली.
तात्काळ उपस्थित शिक्षक व इतरांनी निधीला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. निधीच्या मृत्यूचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. निधीचे पालक महाड येथे दाखल झाल्यानंतर तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे.
या आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण शालेय विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली असून, पारितोषिक वितरण समारंभावरही दुःखाचे सावट निर्माण झाले आहे. शहाबाज हायस्कूलवरही या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
