• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रेवदंडा येथे मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

ByEditor

Dec 13, 2025

रेवदंडा । सचिन मयेकर
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. रेवदंडा, पार नाका येथे शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.१० वाजता छापा टाकून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे रेवदंडा, पार नाका येथे जनसेवा डेअरीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत (ता. अलिबाग) बेकायदेशीर मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड-अलिबाग येथील पोलीस हवालदार रुपेश बबन निगडे (वय ४१) यांनी या गुन्ह्याची फिर्याद दिली आहे.

या कारवाईत अनंत शंकर पाटील (वय ५४, रा. ताजपूर, पोस्ट सुडकोली, ता. अलिबाग) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी अनंत शंकर पाटील हा लोकांकडून पैसे स्वीकारून चिठ्ठ्यांवर आकडेमोड लिहून “कल्याण मेन” नावाचा मटका जुगाराचा धंदा बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी चालवत असताना मिळून आला. जुगारातून मिळालेली रोख रक्कम दुसऱ्या एका आरोपीकडे जमा केली जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी आरोपीच्या पॅन्टच्या उजव्या खिशातून ₹ ३,८३० रोख रक्कम, तसेच आकडे मोड केलेल्या ११ चिठ्ठ्या असा एकूण ₹ ३,८३५ रुपयांचा जप्तमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १९४/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ चे कलम $१२(अ)$ प्रमाणे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक श्री. किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलीस नाईक क्र. २२९० एस. ए. गव्हाणे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!