थर्मल ड्रोन असूनही ठावठिकाणा लागत नाही; नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन
रेवदंडा-अलिबाग | सचिन मयेकर
नागाव, अलिबाग: नागाव-साखर परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेला तणाव कायम आहे. सध्या साखर कोळीवाडा भागात बिबट्याचा कसून शोध सुरू असला तरी, दाट तिवर (मँग्रोव्ह) आणि झाडीमुळे ही शोधमोहीम अत्यंत आव्हानात्मक बनली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांच्या म्हणण्यानुसार, साखर खाडीचा परिसर हा अत्यंत दाट तिवर आणि झाडांनी वेढलेला आहे. यामुळे या नैसर्गिक आडोशांमध्ये बिबट्या नेमका कुठे लपला आहे, याचा माग घेणे वनविभागासाठी मोठे आव्हान ठरत आहे.

आधुनिक साधनेही अपुरी
या अत्यंत किचकट शोधमोहिमेसाठी वनविभाग, पुणे येथील विशेष बचाव पथक (रेस्क्यू टीम), मँग्रोव्ह स्टाफ आणि स्थानिक ग्रामस्थ यांचे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापरही करण्यात आला. मात्र, दाट झाडी आणि खाडी परिसरामुळे ड्रोन उडवूनही बिबट्याचा ठावठिकाणा स्पष्टपणे शोधता येत नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
अफवांवर विश्वास ठेवू नका!
दरम्यान, वनविभागाने साखर, नागाव आणि परिसरातील वाड्यांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधून जनजागृती केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्या दिसल्यास, त्याच्या हालचालीची किंवा खात्रीशीर माहिती मिळाल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पाटील यांनी सांगितले की, कोणताही फोन, संदेश किंवा माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी जाऊन सत्यता पडताळत आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारे अप्रमाणित व्हिडिओ, मेसेज किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. चुकीच्या बातम्यांमुळे विनाकारण भीती पसरते आणि बचावकार्यात अडथळे निर्माण होतात.
पिंजऱ्याकडे बिबट्याचे दुर्लक्ष
सध्या साखर कोळीवाडा भागात चार पिंजरे लावण्यात आले असून, त्यात कोंबडी आणि बकरी ठेवून बिबट्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, बिबट्याच्या स्वभावाविषयी माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, बिबट्या हा लाजाळू प्राणी असून शक्यतो माणसांपासून दूर राहतो. त्याला चिथावणी न दिल्यास, तो स्वतःहून परिसर सोडून जाण्याची शक्यता अधिक आहे. खाडी परिसरात मासे आणि खेकडे हे त्याचे नैसर्गिक खाद्य सहज उपलब्ध असल्याने तो पिंजऱ्यातील आमिषाकडे आकर्षित होत नसल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
वनविभागाकडून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
