शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष; ऑईल माफियांवर कारवाईची स्थानिकांची मागणी
उरण, दि. १६ (विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील मोरा समुद्रकिनाऱ्यावर डिझेल आणि तत्सम तेलाची तस्करी खुलेआम सुरू असूनही, शासकीय यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. खुलेआमपणे किनाऱ्यावर हा अवैध व्यवसाय करणाऱ्या ऑईल माफियांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
जेएनपीटी परिसरात तस्करीचा नवा मार्ग
जेएनपीटी (JNPT) बंदरात येणाऱ्या परदेशी जहाजांमधील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून, समुद्रकिनाऱ्यापासून काही नॉटिकल मैल दूर उभ्या राहणाऱ्या जहाजांमधून डिझेल लहान बोटीत उतरवले जाते. त्यानंतर खाडीमार्गे हे डिझेल तस्करी करण्याचे काम मागील काही वर्षांपासून उरण परिसरात जोरात सुरू आहे.
सागरी पोलीस ठाणे तसेच तटरक्षक दल (Coast Guard) यांना या तस्करीची माहिती असूनही, त्यांच्या आशीर्वादानेच हा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. परदेशी जहाजातून सुमारे ₹ ३० प्रति लीटर दराने मिळणारे हे डिझेल, तस्कर चढ्या दराने बाजारपेठेत विकून मोठ्या प्रमाणात महसूल बुडवत आहेत.
किंमत वाढीमुळे तस्करीला मागणी
सध्या डिझेलच्या वाढत्या किमती पाहता, अनेक व्यावसायिक काळ्या बाजारातून डिझेल खरेदी करताना दिसत आहेत. सागरी पोलीस ठाण्यांचे सागरी मार्गाकडे दुर्लक्ष असल्यामुळे खाडीच्या परिसरात डिझेलची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या काही दिवसांत या तस्करीचा जोर वाढला आहे. हे ‘समुद्र चाचे’ बाहेरून येणाऱ्या बार्जेसच्या चालकांकडून हजारो लिटर डिझेल कमी भावात विकत घेतात आणि नंतर ते साठवून ठेवतात. उरण, पनवेल, वडखळ, नागोठणे या भागातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक या तस्करांशी संपर्क साधून, कमी किमतीत डिझेल खरेदी करत असल्याने, तस्करांचा धंदा तेजीत आहे.
२६/११ च्या हल्ल्याचा विसर
डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हा अवैध धंदा जोरात सुरू आहे. परंतु, वेळीच या ‘समुद्र चाच्यांवर’ बंधने घातली नाहीत, तर या मार्गाचा वापर भविष्यात अतिरेकी कारवाया करण्यासाठी झाल्यास नवल वाटू नये, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. उरण, करंजा जेट्टी व खाडीचा वापर २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी करण्यात आल्याचे त्यावेळी उघड झाले होते. या घटनेचा विसर पोलीस खात्याला पडल्याचे चित्र दिसत आहे.
उरण तालुका हे एक बेट असून सभोवताली खाडी पसरलेली आहे. याचा फायदा घेत डीझेल व तत्सम तेलाची तस्करी करणारे तस्कर खुलेआम डीझेल तस्करी करून उरण-मोरा परिसरात धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे या माफियांवर ठोस आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.
