माणगाव । सलीम शेख
माणगाव तालुक्यातील मोर्बा गावचे सुपुत्र, शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अस्लम राऊत यांनी शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) जाहीर प्रवेश करणार आहेत.
२० डिसेंबरला पक्षप्रवेशाचा भव्यदिव्य सोहळा
शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. मोर्बा येथील एस.एस. हायस्कूलच्या मैदानावर हा भव्यदिव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अस्लम राऊत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
शेकापला मोठा हादरा
अस्लम राऊत यांच्या या निर्णयामुळे माणगाव तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला फार मोठा राजकीय हादरा बसला असून, त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निश्चितपणे अधिकच वाढणार आहे.
अस्लम राऊत यांनी शेकापमध्ये गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केले असून, पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपली ओळख निर्माण केली होती. रायगड जिल्हा परिषदेवर ते तीनवेळा निवडून आले असून, राजिपचे कृषी सभापती म्हणूनही त्यांनी आपल्या कारकिर्दीत जिल्ह्यात उल्लेखनीय काम केले. बहुजन समाजात त्यांची एक प्रामाणिक नेते म्हणून तळागाळात ओळख आहे.
मोर्बा गावचे सुपुत्र असल्याने त्यांची मोर्बा विभागात मोठी ताकद आहे. गरीब जनतेच्या हाकेला सतत धावत जाऊन मदत केल्याने त्यांनी मोर्बा विभागात मोठा जनप्रभाव पाडला आहे. राजिप सदस्य असताना त्यांनी विभागात विविध विकासाची कामे मार्गी लावली आहेत.
विकासाच्या अटीवर प्रवेश
विकासाची कामे करण्यासाठी सत्ता हे सेवेचे साधन आहे, या उद्देशाने राऊत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मोर्बा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळून विभागातील प्रलंबित विकासाची कामे मार्गी लागावीत, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.
प्रसार माध्यमांजवळ बोलताना अस्लम राऊत यांनी स्पष्ट केले की, “मला मोर्बा जिल्हा परिषद गटाची राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लावावीत, या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”
या पक्ष प्रवेश कार्यक्रमाची जोरदार तयारी मोर्बा विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुरू झाली असून, अस्लम राऊत यांच्या पक्ष प्रवेशामुळे मोर्बा शहरात आता कोणी विरोधी पक्ष शिल्लक उरला नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
