उरण | घन:श्याम कडू
पक्षहिताला सर्वोच्च स्थान देत शिवसेना नेतृत्वाने उरण तालुक्यात मोठा आणि ठोस निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले अतुल भगत यांची तत्काळ जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी विनोद सदाशिव साबळे यांची नवीन जिल्हाध्यक्ष (प्रभारी जिल्हाप्रमुख, उरण विधानसभा) म्हणून निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते विनोद साबळे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिस्त व लढाऊ वृत्ती उरणमध्ये अधिक जोमाने रुजवण्याची जबाबदारी आता विनोद साबळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन संघटन मजबूत करणे आणि पक्षवाढीसाठी आक्रमक भूमिका घेणे, अशी अपेक्षा पक्ष नेतृत्वाने व्यक्त केली आहे. पद म्हणजे मिरवण्याची गोष्ट नाही, तर जनतेसाठी झटण्याची जबाबदारी आहे. शिवसेनेत अपयशाला पाठीशी घातले जात नाही, तर काम करणाऱ्यालाच संधी दिली जाते, हे या बदलातून स्पष्ट झाले आहे. नव्या नेतृत्वाखाली उरणमध्ये शिवसेना अधिक ताकदीने उभी राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
