• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण नगरपालिकेत सत्तांतर; महाविकास आघाडीचा ऐतिहासिक विजय

ByEditor

Dec 21, 2025

भाजपाची सत्ता संपुष्टात; नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर यांचा दणदणीत विजय

उरण । घनःश्याम कडू
गेल्या अनेक वर्षांपासून उरण नगरपालिकेत असलेली भारतीय जनता पक्षाची सत्ता उरणकरांनी अखेर उलथवून लावली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारत ऐतिहासिक विजय संपादन केला असून, नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या स्थानिक साम्राज्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवण्यासोबतच महाविकास आघाडीने २१ पैकी ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जरी नगरसेवक संख्येत भाजप पुढे असली, तरी शहराच्या सर्वोच्च पदावर (नगराध्यक्ष) महाविकास आघाडीने बाजी मारल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेचा कौल

गेल्या काही वर्षांत उरण शहरात रस्त्यांची झालेली दुर्दशा, पाणीटंचाई, अस्वच्छता आणि नागरी सुविधांचा अभाव यांमुळे सत्ताधारी भाजपविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष होता. प्रचारादरम्यान महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी आक्रमक प्रचार करत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा पर्दाफाश केला, ज्याचा सकारात्मक परिणाम निकालात दिसून आला.

सामाजिक एकजूट आणि ‘स्थानीय’ अस्मिता

भावना घाणेकर या आगरी-कोळी-कराडी समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने स्थानिक समाजाने त्यांना मोठी साथ दिली. परप्रांतीयांच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर समाज एकवटल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. विशेषतः महिला मतदारांनी भावना घाणेकर यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी केल्याने भाजपचे वर्चस्व मोडीत निघाले.

राजकीय वर्चस्वाला धक्का

हा निकाल आमदार महेश बालदी यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. “भाजपाची जुलमी राजवट आता संपुष्टात आली असून, हा विजय उरणच्या जनतेचा आहे,” अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे नेते आणि माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केली.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर आणि विजयी नगरसेवकांचे मनोहरशेठ भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मनसे जिल्हाप्रमुख संदेश ठाकूर व इतर नेत्यांनी अभिनंदन केले आहे. या निकालाचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!