अतुल चोगले यांचा विजय; मंत्री आदिती तटकरे यांना धक्का
श्रीवर्धन । अनिकेत मोहीते
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी अत्यंत संमिश्र कौल दिला आहे. नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) १५ उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत सभागृहात स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. मात्र, थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अतुल चौगुले यांनी बाजी मारली आहे. त्यांनी २१९ मतांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत नगराध्यक्षपदावर भगवा फडकवला आहे.
दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मंत्री तटकरे यांनी स्वतः श्रीवर्धनमध्ये तळ ठोकून प्रचाराचे नियोजन केले होते. राष्ट्रवादीने १५ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले असले, तरी नगराध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण खुर्ची राखण्यात महायुतीला अपयश आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
पक्षनिहाय अंतिम बलाबल:
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): १५ जागा
शिवसेना (शिंदे गट): ०३ जागा
भारतीय जनता पार्टी: ०२ जागा
नगराध्यक्ष: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
| प्रभाग क्रमांक | उमेदवार | राजकीय पक्ष / गट |
| प्रभाग १ अ | अनंत गुरव | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग १ ब | शमा वैद्य | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग २ अ | हरिदास वाघे | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग २ ब | प्रगती वाघे | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग ३ अ | सलोनी मोहित | शिवसेना (शिंदे गट) |
| प्रभाग ३ ब | देवेंद्र भुसारे | शिवसेना (शिंदे गट) |
| प्रभाग ४ अ | सुप्रिया चोगले | भारतीय जनता पार्टी (भाजप) |
| प्रभाग ४ ब | संतोष वेश्वीकर | शिवसेना (शिंदे गट) |
| प्रभाग ५ अ | साक्षी पब्रेकर | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग ५ ब | प्रणील बोरकर | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग ६ अ | राजसी मुरकर | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग ६ ब | प्रसाद विचारे | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग ७ अ | शिवानी चौले | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग ७ ब | इफ्तिकार राजपुरकर | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग ८ अ | शबिस्ता सरखोत | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग ८ ब | समीर साठविलकर | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग ९ अ | बाळकृष्ण गोरनाक | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग ९ ब | प्रवीता माने | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग १० अ | गुलाब मांडवकर | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
| प्रभाग १० ब | भावेश मांजरेकर | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) |
सत्ता समीकरणाचे नवे आव्हान
सभागृहात अजित पवार गटाचे पूर्ण बहुमत आणि अध्यक्षपदी ठाकरे गटाचा नेता, अशा विचित्र परिस्थितीमुळे आगामी काळात श्रीवर्धनच्या विकासाचा गाडा हाकताना समन्वय कसा साधला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्रकारांचा निषेध आणि प्रशासनाची दिलगिरी
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान पत्रकारांना केंद्रात प्रवेश नाकारण्यात आल्याने पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकाराचा जिल्हाभरातील पत्रकार संघटनांनी निषेध केला. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी पत्रकारांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली व भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नाही, असे आश्वासन दिले.
