खासदार सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मोर्ब्यात रंगला सोहळा
माणगाव । सलीम शेख
रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अस्लम राऊत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे मोर्बा जिल्हा परिषद मतदारसंघ आणि माणगाव तालुक्यात शेकापला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीची ताकद द्विगुणित झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्बा येथे हा सोहळा पार पडला.
“तटकरेंच्या विरोधात लढण्याची आता ताकद नाही” – अस्लम राऊत
गेली ३७ वर्षे शेकापशी एकनिष्ठ राहिलेले अस्लम राऊत यांनी प्रवेशावेळी भावनिक उद्गार काढले. ते म्हणाले, “तटकरे साहेब, आता तुमच्या विरोधात लढण्याची ताकद माझ्यात राहिलेली नाही. मोर्बा शिक्षण संस्थेला बळकटी मिळावी, येथे ‘बीएससी आयटी’सारखे कोर्सेस सुरू व्हावेत आणि विभागाचा विकास व्हावा, याच हेतूने मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या विकास कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला आहे.”
“अस्लमभाईंच्या पाठीशी पक्ष ताकद उभी करेल” – खा. सुनील तटकरे
यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, “राष्ट्रवादी पक्ष शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. अस्लम राऊत यांच्याशी आमचा राजकीय संघर्ष राहिला असला तरी वैयक्तिक मतभेद कधीच नव्हते. त्यांच्या अनुभवाचा फायदा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाला निश्चित होईल. मोर्बा हायस्कूलच्या इमारतीसह सर्व शैक्षणिक प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.”
मोर्बा विभागाला झुकते माप देऊ – ना. आदिती तटकरे
मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, रायगडमधील शिक्षण क्षेत्रासाठी तटकरे साहेबांचे योगदान मोठे आहे. अस्लम राऊत यांना अभिप्रेत असलेले शैक्षणिक संकुल मोर्बा येथे उभे करण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत केली जाईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा आणि तालुक्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
समर्थकांचा मोठा ताफा राष्ट्रवादीत
अस्लम राऊत यांच्यासोबत मोर्बा, राऊत मोहल्ला, बौद्धवाडी, बोर्ले, देगाव, शिरवली, निळगुण, नाईटणे, पुरार, रिळे, तारणे यांसह अनेक गावांतील आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.
या सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर पाटील, प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, तालुकाध्यक्ष बाळाराम नवगणे, शादाब गैबी, अल्ताफ धनसे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
