वन विभाग आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेकडून शोधमोहीम सुरू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोलाड | विश्वास निकम
रोहा तालुक्यातील ऐनवहाळ परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, मंगळवारी (२३ डिसेंबर) पहाटे सहाच्या सुमारास केलेल्या हल्ल्यात एका खिल्लार बैलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे ऐनवहाळसह परिसरातील गावांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ऐनवहाळ येथील पोलीस पाटील प्रकाश शांताराम मोरे यांच्या मालकीचा अंदाजे ३० हजार रुपये किमतीचा खिल्लार बैल गोठ्यात असताना, पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यावर झडप घातली. या हिंस्त्र हल्ल्यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली.
प्रशासन आणि सामाजिक संस्था सतर्क
ऐनवहाळ, डोळवहाळ, रेवेचीवाडी आणि चिंचवली तर्फे अतोणे हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांनी तातडीने वन विभाग, पोलीस प्रशासन आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच तिन्ही पथके घटनास्थळी दाखल झाली असून, त्यांनी परिसराचा पंचनामा केला आहे. सध्या या भागात बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
नागरिकांमध्ये चिंतेचे सावट
बिबट्याच्या या हल्ल्यामुळे पहाटे कामावर जाणारे कामगार, शेतकरी आणि विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनीही आता बाहेर पडणे बंद केले आहे.
वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“आमच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे.”
-स्थानिक नागरिक
