• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिघोडे कोळीवाडा येथे ‘मच्छिमार विकास सहकारी संस्थे’चा दिमाखात शुभारंभ

ByEditor

Dec 24, 2025

कोळी बांधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नवी संघटना सज्ज; मान्यवरांची उपस्थिती

दिघोडे (प्रतिनिधी) : गोरगरीब कोळी बांधवांचे प्रश्न मार्गी लागावे आणि शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील मच्छिमारांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या “पारंपारिक कोळी समाज मच्छिमार वि. का. स. संस्था मर्यादित, दिघोडे” या सहकारी संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा २१ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.

दिघोडे येथील ‘स्वर्गीय केशव बुधाजी नाखवा’ सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शक म्हणून रमेश भास्कर कोळी, सीताराम जनार्दन नाखवा आणि महेंद्र हरिश्चंद्र चोगले उपस्थित होते. तसेच दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तिनिधि हसुराम ठाकूर आणि उपसरपंच कैलास अंबाजी म्हात्रे यांनीही या उपक्रमाला विशेष पाठबळ दर्शवले.

कार्यक्रमात उपस्थित मार्गदर्शकांनी कोळी समाजाचा गौरवशाली इतिहास आणि सध्या भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकला. संस्थेचे चेअरमन अशोक कोळी आणि सेक्रेटरी प्रितेश कोळी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “मच्छिमार बांधवांना संघटित करून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी ही संस्था एक हक्काचे व्यासपीठ म्हणून कार्य करेल.”

या कार्यक्रमाला परिसरातील अन्य मच्छिमार सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून एकजूट दाखवली. यामध्ये गोविंद कोळी (चेअरमन, मोहाकोळीवाडा सोसायटी), हितेश कोळी (चेअरमन, गव्हाण सोसायटी), माणिक कोळी (चेअरमन, मोठीजुई सोसायटी) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांच्यासह आयोजक संस्थेचे खजिनदार राजाराम कोळी, सदस्य तुकाराम नाखवा, हरिश्चंद्र नाखवा, हिराजी नाखवा, जयश्री नाखवा, धनवंती कोळी, रेश्मा कोळी, विजय कोळी, हरेश कोळी व गावातील ज्येष्ठ नागरिक डी. डी. कोळी, के. डी. कोळी, दत्ता कोळी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सेक्रेटरी प्रितेश काशीनाथ कोळी यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. संस्थेचे ध्येय-धोरण स्पष्ट केल्यानंतर, शेवटी चेअरमन अशोक जनार्दन कोळी यांनी सर्व पाहुण्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले. दिघोडे गावात या नवीन सहकारी संस्थेच्या स्थापनेमुळे मच्छिमार वर्गात आनंदाचे वातावरण असून, विकासाची नवी दारे उघडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!