श्रीवर्धन | अनिकेत मोहित
जग आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्र-मंगळावर झेप घेत असताना, दुसरीकडे निसर्गरम्य आणि सुसंस्कृत ओळख असलेल्या श्रीवर्धन शहरात अंधश्रद्धेचा अंधार कायम असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. उतारे टाकणे, करणी-बाधा आणि भोंदूगिरीच्या माध्यमातून उपचार शोधण्याचे प्रकार शहरात वाढू लागल्याने सुज्ञ नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागासोबतच शहरातही विळखा
अंधश्रद्धा ही केवळ अशिक्षित किंवा ग्रामीण भागापुरती मर्यादित राहिलेली नाही. श्रीवर्धनसारख्या शैक्षणिक वारसा लाभलेल्या शहरातही आजारपण, आर्थिक चणचण किंवा कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी विज्ञानाऐवजी ‘टोळक्यांमार्फत’ होणाऱ्या अघोरी उपचारांकडे कल वाढत आहे. अलीकडे घडलेल्या काही घटनांनी या मानसिकतेवर शिक्कामोर्तब केले असून, कायद्याचा धाक आणि विज्ञानाची प्रचिती असतानाही लोक भीतीपोटी या विळख्यात अडकत असल्याचे दिसत आहे.
प्रशासकीय मोहिमा कागदावरच?
महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदा करून आणि विविध संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करूनही लोकांच्या मनातील भीती दूर झालेली नाही. श्रीवर्धनमध्ये सामाजिक चळवळी आणि सांस्कृतिक संस्थांचे मोठे जाळे आहे, तरीही अशा घटना घडणे हे समाजाच्या प्रगतीसाठी मारक ठरत आहे. केवळ औपचारिक व्याख्याने किंवा कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता, ही लढाई आता घरोघरी पोहोचवण्याची गरज निर्माण झाली आहे.
“केवळ कायदे करून अंधश्रद्धा संपणार नाहीत. शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.” असे नागरिकांचे मत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाची ही लढाई प्रदीर्घ आहे. समाजाला खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि प्रगत करायचे असेल, तर संविधानिक मूल्ये आणि विवेकाची कास धरणे हाच एकमेव पर्याय आहे. श्रीवर्धनकरांनी या अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडून विज्ञानाधारित समाज निर्मितीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
