रेवदंडा | सचिन मयेकर
नातेसंबंध आणि विश्वासाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. घराचे कुलूप न फोडता, विश्वासाने दिलेल्या चावीचा वापर करून घरातील २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणात घरातीलच जवळच्या नातेवाईकावर संशयाची सुई असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अलिबाग तालुक्यातील महाजने येथील रहिवासी अरुणा किसन जाधव (५१) यांच्या घरी ही चोरी झाली. २३ जुलै ते १६ नोव्हेंबर २०२५ या प्रदीर्घ कालावधीत घर बंद असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे, घराचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद असतानाही कोणतीही तोडफोड न करता चोरट्याने आत प्रवेश केला होता.
तपासादरम्यान समोर आले की, फिर्यादींचे पती किसन जाधव यांनी घराची चावी विश्वासाने आपला सख्खा पुतण्या संघर्ष नंदकुमार जाधव याच्याकडे दिली होती. संघर्षने ही चावी आपल्या दुचाकीच्या चावीलाच लावून ठेवली होती. ही दुचाकी वापरणारा दुसरा पुतण्या उल्हास वसंत जाधव याला या चावीबाबत पूर्ण कल्पना होती. याच माहितीचा गैरफायदा घेत, फिर्यादींची कोणतीही संमती नसताना घरातील मौल्यवान ऐवज चोरण्यात आला.
एकूण ₹२,७६,००० किंमतीचा ऐवज चोरीला गेला असून यामध्ये सोन्याचे दागिने (हार आणि ७ अंगठ्या) सुमारे ₹१.५६ लाखांचे, रोख रक्कम: ₹९०,०००, ₹२५,००० किंमतीची तांबा-पितळाची भांडी आणि ₹६५,००० चे नवे कपडे चोरीला गेले आहेत.
या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १९९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांतर्गत दोषीला ७ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, फॉरेन्सिक एक्सपर्ट टीममार्फत शास्त्रीय तपास करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन. आर. आंगज हे करत असून, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
