प्रशासकीय दुर्लक्षामुळे दांडगुरी-बोर्लीपंचतन मार्गाची चाळण; वाहनचालकांमध्ये तीव्र संताप
श्रीवर्धन। गणेश प्रभाळे
कोकणातील निसर्गसौंदर्य आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन सध्या ‘खड्ड्यात’ गेले आहे. विशेषतः दिवेआगर, आरावी, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या मुख्य पर्यटन स्थळांना जोडणारा दांडगुरी – बोर्लीपंचतन हा रस्ता पूर्णपणे उखडला असून, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत खड्ड्यांनी होत आहे.

रस्त्याची झालीय ‘चाळण’
दांडगुरी ते कार्ले या मार्गावर अपूर्ण डांबरीकरणामुळे रस्त्यावरील टोकदार खडी बाहेर आली आहे. या मार्गावर १७ किलोमीटरचा प्रवास निसर्गरम्य असला, तरी त्यातील ६ किलोमीटरच्या पट्ट्यात पावलोपावली खड्डे, अरुंद रस्ता आणि खचलेले साकव (मोऱ्या) यामुळे पर्यटकांना ‘तारेवरची कसरत’ करावी लागत आहे. निसर्ग अनुभवण्याऐवजी वाहनचालकांना आपले वाहन वाचवत प्रवास करावा लागत असल्याने पर्यटकांकडून “नको ते पर्यटन” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
पायाभूत सुविधांचा अभाव
शासनाकडून पर्यटन विकासाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असल्या तरी, श्रीवर्धन तालुक्यातील या मुख्य मार्गाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. वर्षानुवर्षे या रस्त्याची हीच अवस्था असल्याने स्थानिक ग्रामस्थांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
“या मार्गाचे नव्याने डांबरीकरण होणार आहे. येत्या दोन दिवसांत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.” — अक्षय महाजन (विभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग)
पर्यटकांची मागणी
थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी अपघाताचा धोका टाळण्यासाठी आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता, तातडीने रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
