लोकनेते दि. बा. पाटलांचे नाव न दिल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक
शेकापसह विविध संघटनांचा ‘मुंबई जाम’ करण्याचा इशारा
उरण । घन:श्याम कडू
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात झाले असले, तरी विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्याने प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वारंवार दिलेल्या आश्वासनांनंतरही नाव जाहीर न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मान्यवर, प्रवासी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. मात्र, या आनंदाच्या वातावरणातच विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्याने नाराजीचा सूर उमटला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल, असे पुन्हा एकदा आश्वासन दिले होते. तरीही उद्घाटनाच्या दिवशी नाव जाहीर न झाल्याने प्रकल्पग्रस्तांचे समाधान झाले नाही. याच पार्श्वभूमीवर काही प्रकल्पग्रस्तांनी विमानतळ परिसरात, पोलीस बंदोबस्तातच, दि. बा. पाटील यांच्या नावाच्या घोषणा दिल्या.
या विमानतळातून पहिल्या उड्डाणाने प्रवास करणारे ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनीही मुख्यमंत्री यांचे आभार मानताना “दि. बा. पाटील यांचे नाव दिले असते तर आनंद द्विगुणित झाला असता,” अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी दि. बा. पाटील यांचे कुटुंबीयही प्रवाशांसोबत त्यांच्या छायाचित्रांसह उपस्थित होते.
सरकारने ठरल्याप्रमाणे नाव दिले असते तर समाधान वाटले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यानंतर काही तासांतच शेकापचे विधानपरिषदेचे माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी सुदाम पाटील व समर्थकांनी करंजाडे येथील काळभैरव मंदिरासमोर निषेध आंदोलन केले. सरकारसाठी हा सुवर्ण दिन असला, तरी दि. बा. पाटील यांना आदर्श मानणाऱ्यांसाठी हा काळा दिवस असल्याचे त्यांनी जाहीर केले. विमानतळाच्या पूर्व बाजूकडील मार्गावर दि. बा. पाटील यांच्या समर्थनार्थ फलकबाजीही करण्यात आली. जोपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून, गरज पडल्यास मुंबई जाम करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
निवडणूकीची आचारसंहितेचे कारण सांगून आमचे आंदोलन सरकारने दडपले मात्र आचारसंहिता संपल्यावर आगरी समाजातील दि. बा. पाटील यांचे समर्थक सनदशीर मार्गाने सरकारला हिसका दाखवतील. हुतात्म्यांचे रक्त वाया जाऊ द्यायचे नसते याच दि. बां.च्या उक्तीप्रमाणे प्रखर आंदोलन उभे करून दि. बां.चेच नाव या विमानतळाला देण्यास सरकारला भाग पाडू.
-बाळाराम पाटील,
माजी आमदार, शेकाप.
