• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

“विकासाच्या आड येणाऱ्यांची लंगोटीही शाबूत ठेवणार नाही!”; नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचा विरोधकांना थेट इशारा

ByEditor

Dec 26, 2025

उरण नगरपरिषदेत महाविकास आघाडीच्या कारभाराचा श्रीगणेशा; जनशक्तीने धनशक्तीला हरवल्याची नगराध्यक्षांची गर्जना

उरण । घन:श्याम कडू
“उरणची ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होती आणि उरणकरांनी जनशक्तीला कौल दिला आहे. ही खुर्ची शोभेची नसून जबाबदारीची आहे. मी आगरी समाजाची लेक आहे, त्यामुळे उरणच्या विकासाच्या आड जो कोणी येईल, त्याला तिथेच आडवे करू, त्याची लंगोटीही शाबूत ठेवणार नाही,” अशा कडक शब्दांत उरण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी विरोधकांना थेट इशारा दिला.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी पदभार स्वीकारला. यावेळी आयोजित समारंभात त्या बोलत होत्या.

जनतेचा सन्मान सर्वोच्च

भावना घाणेकर यांनी स्पष्ट केले की, जनतेचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. त्या म्हणाल्या, “माझ्याकडून चूक झाली तर माफी मागायला मी तयार आहे, पण उरणकरांच्या हक्कासाठी मी रथी-महारथांच्या दबावालाही बळी पडणार नाही. फक्त १५ दिवसांत उरणच्या जनतेने जी किमया केली, ते सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्ष आणि भ्रष्ट कारभाराला दिलेले सडेतोड उत्तर आहे.”

समस्यांवर तातडीने उपाययोजना

शहरातील रखडलेल्या प्रश्नांवर भाष्य करताना नगराध्यक्षांनी कामाची दिशा स्पष्ट केली. पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकामे आणि नाले सफाईच्या प्रश्नावर तातडीने लक्ष दिले जाईल. उरण बायपास रस्त्यासाठी आवश्यक निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. नगरपरिषदेत सर्व पक्षांचे झेंडे बाहेर ठेवून केवळ ‘जनतेचे सेवक’ म्हणून काम केले जाईल.

नवीन उपक्रमांची घोषणा

नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. दर १५ दिवसांनी नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी जनता दरबार भरवला जाईल. तक्रारींसाठी विशेष हेल्पलाईन सुरू केली जाईल. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नगरपरिषदेत प्रतिनिधी नागरिकांसाठी उपलब्ध असतील.

टीकेचा खरपूस समाचार

निवडणूक प्रचारादरम्यान जितेंद्र आव्हाड, बाळ्या मामा आणि स्वर्गीय प्रशांत पाटील यांच्यावर झालेल्या टीकेचा निषेध करत त्यांनी ठणकावून सांगितले की, “आमच्या नेत्यांचा अपमान विसरला जाणार नाही. आरेला कारे असे उत्तर दिले जाईल.”

नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत नगराध्यक्षा म्हणून बसण्याचा पहिला मान भावना घाणेकर यांना मिळाला. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मार्तंड नाखवा, मिलिंद पाडगावकर, रवी घरत, ज्येष्ठ पत्रकार दा. चां. कडू गुरुजी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवनिर्वाचित मंडळाला शुभेच्छा दिल्या. अपंग संघटनेच्या वतीनेही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!