ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतापूर्वीच पर्यटकांचा लोंढा; रखडलेले महामार्ग आणि अर्धवट बायपासचा बसतोय फटका
माणगाव (सलीम शेख): ख्रिसमस, शनिवार-रविवारच्या जोडून आलेल्या सुट्ट्या आणि आगामी ‘थर्टी फर्स्ट’चा मुहूर्त साधून कोकणाकडे निघालेल्या पर्यटकांच्या उत्साहावर माणगावच्या भीषण वाहतूक कोंडीने पाणी फेरले आहे. मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे माणगाव शहर सध्या ‘कोंडवाडा’ बनले असून, रखडलेल्या महामार्गाचे काम आणि कागदावरच राहिलेला बायपास यामुळे पर्यटकांसह स्थानिकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाहनांच्या ३ किलोमीटरपर्यंत रांगा
पुणे बाजूकडून ताम्हिणी घाटातून येणाऱ्या वाहनांची आणि मुंबई-गोवा महामार्गावरून येणाऱ्या वाहनांची माणगावात मोठी गर्दी झाली आहे. सकाळपासूनच शहराच्या दोन्ही बाजूंना दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, मुरुड-जंजिरा या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांना तासनतास एकाच जागी अडकून पडावे लागले.

पोलिसांची मोठी दमछाक
वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी माणगाव पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखेच्या वतीने माणगाव बस स्थानक, निजामपूर रोड, कचेरी रोड आणि मोर्बा नाका या प्रमुख ठिकाणी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, वाहनांची संख्या आवाक्याबाहेर असल्याने आणि रस्ते अरुंद असल्याने पोलिसांची मोठी दमछाक होताना दिसत आहे. ही स्थिती थर्टी फर्स्टपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस यंत्रणेसाठी मोठी परीक्षा ठरणार आहेत.
प्रशासकीय अपयश आणि ठेकेदारांचा ढिम्मपणा
माणगाव हे कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते, मात्र हेच प्रवेशद्वार सध्या प्रशासकीय निष्क्रियतेचे केंद्र बनले आहे. इंदापूर आणि माणगाव बाजारपेठेतील ताण कमी करण्यासाठी बायपास मार्गाचे नियोजन करण्यात आले होते, मात्र त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे.
वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का होत नाही?, कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही बायपास केवळ कागदावरच का?, उद्घाटनांचे श्रेय घेणारे लोकप्रतिनिधी सामान्य जनतेच्या त्रासाकडे डोळेझाक का करत आहेत? असे अनेक सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.
पर्यटनाला फटका बसण्याची भीती
कोकण पर्यटनाच्या नकाशावर वेगाने प्रगत होत असताना, प्रवासातील या अडथळ्यांमुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे. “महामार्गावरील अर्धवट पूल, ठिकठिकाणी उखडलेले रस्ते आणि नियोजनाचा अभाव यामुळे आमची सुट्टी प्रवासातच वाया जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका पर्यटकाने व्यक्त केली.
माणगावचा ‘कोंडमार्ग’
माणगावची ही कोंडी ‘अचानक’ आलेली नसून ती वर्षानुवर्षे रखडवलेल्या कामांची परिणती आहे. शासनाने आणि संबंधित ठेकेदारांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला गती देणे गरजेचे आहे, अन्यथा सणासुदीच्या प्रत्येक सुट्टीत माणगावची वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरेल.
