दिघी सागरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपींना बेड्या
बोर्ली पंचतन | अभय पाटील
म्हसळा तालुक्यातील खानलोशी आदिवासीवाडी परिसरात एका निवृत्त कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना दिघी सागरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. केवळ एका ‘ब्लँकेट’च्या आधारावर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.
धक्कादायक घटना आणि तपास
२४ डिसेंबर रोजी दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत आढळले होते. सुरुवातीला हा आकस्मिक मृत्यू वाटत असला, तरी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. बोर्ली पंचतन बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मृताची ओळख पटवण्यात आली. मृत व्यक्ती म्हसळा पंचायत समितीचे सेवानिवृत्त कर्मचारी शशांक शरद कुडाळकर (वय ५९ वर्षे) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या शरीरावर आणि डोक्यावर असलेल्या जखमांमुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.
केवळ एका ‘ब्लँकेट’ने दिला सुगावा
गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेले एक ब्लँकेट आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान प्रकाश लक्ष्मण वाघमारे आणि संदीप चंद्रकांत पवार (दोघेही रा. खानलोशी आदिवासीवाडी) यांची नावे समोर आली. पोलिसांनी शिताफीने या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी खुनाची कबुली दिली.
खुनाचे कारण: १५ दिवसांपूर्वीचा वाद
१९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रकाश आणि संदीप हे पायी जात असताना त्यांना समोरून शशांक कुडाळकर येताना दिसले. सुमारे १५ दिवसांपूर्वी झालेल्या शाब्दिक वादाचा राग मनात धरून प्रकाशने कुडाळकर यांना हटकले. यातून पुन्हा वाद निर्माण झाला आणि रागाच्या भरात दोन्ही आरोपींनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या लाकडी दांडक्याने कुडाळकर यांना बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
गुन्हा पचवण्यासाठी आरोपींनी मारहाणीसाठी वापरलेला दांडका चार तुकड्यांत फोडून लपवून ठेवला होता. तसेच मृताची ओळख पटू नये म्हणून त्यांच्या खिशातील आधारकार्डही काढून घेतले होते. मात्र, पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस पथकाचे कौतुक
रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हनुमंत शिंदे, उपनिरीक्षक चौलकर व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
“प्राथमिक दृष्ट्या हा मृत्यू आत्महत्या वाटत होता, परंतु पोलिसांनी मुळाशी जाऊन तपास केल्याने एका निष्पाप व्यक्तीला न्याय मिळाला. तपासी अधिकारी हनुमंत शिंदे आणि त्यांच्या टीमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.”
-सविता गर्जे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन.
