प्रशासनाचा ढिसाळ कारभार; वाढत्या अपघातांमुळे नागरिकांचा संताप
श्रीवर्धन | अनिकेत मोहिते
नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना, प्रशासनाचा ठळक निष्काळजीपणा समोर येत आहे. तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या वाहनांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, यात काही पर्यटकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत, तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. या वाढत्या अपघातांच्या सत्रामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नुकत्याच घडलेल्या एका भीषण अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला. संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांच्या वाहनाला घेराव घालत चक्क हाताने गाडीच्या काचांवर फटके मारल्याचा प्रकार घडला. तालुक्यात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊन आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊनही प्रशासन अजूनही पुरेसे जागे झालेले दिसत नाही, ही चिंतेची बाब आहे. श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांकडून वाहने थेट वाळूत नेली जात आहेत, ज्यामुळे अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे. मात्र, याकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत असून, एखादी मोठी जीवितहानी झाल्यावरच प्रशासन कारवाई करणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नियमभंग झाल्यानंतर केवळ दंड आकारण्यापेक्षा, असे प्रकार घडूच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे अधिक आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. प्रशासनाने तयार केलेली नियमावली केवळ कागदापुरती मर्यादित न राहता तिची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. श्रीवर्धनमध्ये येणारा पर्यटक प्रामुख्याने मौजमस्तीच्या उद्देशाने येतो, मात्र त्याला येथील स्थानिक नियम, वाहतूक व्यवस्था आणि समुद्रकिनाऱ्यावरील निर्बंधांची कोणतीही माहिती नसते. प्रशासनाकडून ही माहिती देण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक प्रमुख ठिकाणी नियमांची माहिती देणारे फलक आणि बॅनर लावून व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी होत आहे.
यासोबतच, हॉटेल व्यावसायिक, रिसॉर्ट मालक आणि स्थानिक दुकानदार यांना विश्वासात घेऊन त्यांच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत नियमांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. फक्त नाक्यावर उभे राहून दंडात्मक कारवाई करणे हे प्रशासनाचे एकमेव काम नसून, जनजागृती करणे हे पहिले आणि महत्त्वाचे कर्तव्य आहे, असे मत नागरिकांनी ठामपणे मांडले आहे. प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
