घाटात टायर फुटल्याने गरोदर महिलेचा जीव टांगणीला; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
महाड | मिलिंद माने
तालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार समोर आला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप रुग्णांचा जीव धोक्यात सापडला आहे. आज सकाळी एका गरोदर महिलेला उपचारासाठी नेत असताना पाचाड घाटात रुग्णवाहिकेचा टायर अचानक फुटला. सुदैवाने, चालक अनंत औकिरकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली, मात्र या घटनेने आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचे धिंडवडे काढले आहेत.
दीड वर्षांपासून कागदपत्रे कालबाह्य
या अपघातानंतर संबंधित रुग्णवाहिकेची (क्रमांक MH-06-BW-5402) ऑनलाईन तपासणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या वाहनाचा इन्शुरन्स १३ मे २०२२ रोजीच संपला असून, फिटनेस प्रमाणपत्रही २६ मे २०२३ पर्यंतच वैध होते. म्हणजेच गेल्या दीड वर्षांपासून कोणतीही कायदेशीर पूर्तता नसताना ही रुग्णवाहिका बेधडकपणे रस्त्यावर धावत आहे.
टायरची अवस्था ‘गोटा’; तक्रारींकडे दुर्लक्ष
पाचाडचा घाट हा अत्यंत तीव्र वळणांचा आणि डोंगराळ भागातील आहे. अशा धोकादायक रस्त्यावर धावणाऱ्या या रुग्णवाहिकेचे चारही टायर पूर्णतः झिजलेले आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांनी वारंवार आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेच्या धामधुमीत आरोग्य विभागाला स्वतःच्या यंत्रणेच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा टोला नागरिक लगावत आहेत.
प्रशासनाकडून मृत्यूला आमंत्रण?
गरोदर महिला आणि आपत्कालीन रुग्णांसाठी ‘जीवनवाहिनी’ ठरणारी रुग्णवाहिकाच आता ‘मृत्यूचे आमंत्रण’ ठरू लागली आहे. विना विमा आणि विना फिटनेस ही रुग्णवाहिका रस्त्यावर उतरवून आरोग्य विभागाने आरटीओ नियमांना केराची टोपली दाखवली आहे.
“रुग्णवाहिकेची ही अवस्था पाहता, एखादा मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? केवळ कागदोपत्री आरोग्य सेवा देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष मैदानावर यंत्रणा सक्षम हवी. आरटीओ विभागाने अशा वाहनांवर तत्काळ कारवाई करावी.” अशी प्रतिक्रिया संतापलेल्या नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.
तालुक्यातील सर्व रुग्णवाहिकांची तपासणी व्हावी
या घटनेनंतर महाड तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांचे ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तातडीने मेंटेनन्स न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
