खासदारांच्या नेतृत्वाला मतदारांकडून सपशेल नकार; राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
उरण | घनःश्याम कडू
नुकत्याच पार पडलेल्या उरण नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे) गटाला मोठा राजकीय हादरा बसला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाच्या तब्बल ४ उमेदवारांसह एकूण ६ जणांचे डिपॉझिट (अनामत रक्कम) जप्त झाले असून, ‘संसदरत्न’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बड्या नेत्यांची प्रतिष्ठा धुळीला
उरण नगरपालिका हा मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग असून, खासदार श्रीरंग बारणे यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. निवडणुकीच्या तोंडावर तुषार ठाकूर आणि रुपाली ठाकूर या दांपत्याला पक्षात प्रवेश देऊन रुपाली ठाकूर यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, मतदारांनी या ‘आयात’ उमेदवाराला नाकारले असून, खुद्द नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुपाली ठाकूर यांचेही डिपॉझिट जप्त झाल्याने शिंदे गटाची मोठी नाचक्की झाली आहे.
डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार:
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ५३ उमेदवारांपैकी ३२ उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यापैकी ६ जणांना किमान मतेही मिळवता आली नाहीत. यात सर्वाधिक उमेदवार शिंदे गटाचे आहेत:
- रुपाली तुषार ठाकूर (नगराध्यक्ष उमेदवार – शिवसेना शिंदे गट)
- अनंत मधुकर कोळी (नगरसेवक उमेदवार – शिवसेना शिंदे गट)
- हंसराज महादेव चव्हाण (नगरसेवक उमेदवार – शिवसेना शिंदे गट)
- मुकरी अश्मील मोहम्मद अली (नगरसेवक उमेदवार – शिवसेना शिंदे गट)
- नसरीन इसरार शेख (अपक्ष नगराध्यक्ष उमेदवार)
- अंजली तुकाराम खंडागळे (वंचित बहुजन आघाडी)
विजयाचा करिष्मा ओसरला?
शिवसेना फुटीनंतर खासदार बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी उरणमध्ये आघाडी घेतली असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र त्यांना आपला करिष्मा दाखवता आला नाही. सत्तेचे पाठबळ आणि खासदारांचे नेतृत्व असूनही मतदारांनी दिलेला हा कौल शिंदे गटासाठी ‘राजकीय नामुष्की’ मानली जात आहे.
उरणच्या राजकारणात सध्या या निकालाचीच चर्चा असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी हा निकाल धोक्याची घंटा मानला जात आहे.
