अवैध दारूविक्रीला चाप बसणार; ऐतिहासिक गावात महिलांच्या पुढाकाराने ‘बाटली आडवी’
उरण | अनंत नारंगीकर
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या चिरनेर गावामध्ये महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अवैध दारूविक्री विरोधात एल्गार पुकारला आहे. शुक्रवारी आयोजित विशेष ग्रामसभेत महिलांच्या प्रचंड उपस्थितीत गावात ‘पूर्ण दारूबंदी’ करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे व्यसनाधीनतेच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी चिरनेरने एक मोठे पाऊल उचलले आहे.
कौटुंबिक कलह आणि तरुण पिढीचा ऱ्हास
चिरनेर हे सुसंस्कृत गाव म्हणून ओळखले जाते, मात्र गेल्या काही काळापासून गावात छुप्या मार्गाने होणाऱ्या अवैध दारूविक्रीने डोके वर काढले होते. दारूमुळे घरगुती हिंसाचार, कौटुंबिक कलह आणि तरुण पिढी मृत्यूच्या दारात उभी राहिल्याच्या घटना समोर येत होत्या. अलीकडेच एका तरुणाने दारूच्या नशेतून केलेल्या मारहाणीमुळे गावात अशांतता पसरली होती. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून अखेर गावातील माता-भगिनींनी एकत्र येत दारू हद्दपार करण्याचा निर्धार केला.
ग्रामसभेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महिलांच्या मागणीवरून तातडीने बोलावण्यात आलेल्या या ग्रामसभेत सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत दारूबंदीवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी व्यसनाधीनतेमुळे होणारे नुकसान मांडले आणि दारूबंदीसाठी आग्रही भूमिका घेतली. अखेर सर्वसंमतीने दारूबंदीचा ठराव मंजूर होताच महिलांनी जल्लोष केला.
प्रशासनाला धाडले पत्र
केवळ ठराव करून न थांबता, ग्रामपंचायतीने या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलली आहेत. रायगड जिल्हाधिकारी, उरण तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती आणि उत्पादन शुल्क विभागाला पत्राद्वारे या निर्णयाची माहिती देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक निर्णयावेळी सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील, ग्रामसेवक रवींद्र गावंड, सदस्य पद्माकर फोफेरकर, प्रफुल्ल खारपाटील, सचिन घबाडी, समाधान ठाकूर, समाजसेविका जयवंती गोंधळी यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
चिरनेरच्या या निर्णयामुळे संपूर्ण उरण तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रशासकीय यंत्रणा आता गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री कायमची बंद करणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
