३१ डिसेंबरच्या रात्री १३ मद्यपी चालकांवर गुन्हे; बेशिस्त चालकांना ‘खाकी’चा इंगा
उरण | अनंत नारंगीकर
उरण शहर आणि परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने सन २०२५ या वर्षभरात आक्रमक पवित्रा घेतला. वर्षभरात एकूण ५१,०६८ वाहनांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली असून, तब्बल ४ कोटी ९३ लाख ३१ हजार २०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाया अवैध पार्किंगवर झाल्या असून, ३१ डिसेंबरच्या रात्रीही पोलिसांनी मद्यपी चालकांना चांगलाच दणका दिला आहे.
अवैध पार्किंगचा सर्वाधिक विळखा
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, उरणमध्ये रस्त्यावर अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहन उभे करणाऱ्या २४,७९३ चालकांवर कारवाई करण्यात आली. शहरात पार्किंगच्या समस्येमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्याखालोखाल विना सीटबेल्ट प्रवास करणाऱ्या १२,६४० आणि विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ५,७८२ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील:
- मोबाईलवर बोलणे: ५६४ केसेस
- विरुद्ध दिशेने वाहन चालवणे: १७० केसेस
- मद्यप्राशन (वर्षभरात): १७१ केसेस
थर्टी फर्स्टला १३ जणांवर गुन्हे
नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्री विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत रात्री उशिरापर्यंत चाललेल्या तपासणीत १३ चालक मद्यधुंद अवस्थेत आढळले, त्यांच्यावर ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वसुलीचे पोलिसांसमोर आव्हान
वाहतूक शाखेने जरी ४ कोटी ९३ लाखांहून अधिक दंड आकारला असला, तरी प्रत्यक्षात केवळ ३४ लाख ३४ हजार २५० रुपये दंड वसूल झाला आहे. उर्वरित दंड प्रलंबित असल्याने, वाहन चालकांनी आपले ई-चलन त्वरित भरावे, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे.
”वाहतुकीचे नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आहेत. २०२६ मध्येही बेशिस्त वाहन चालकांवर ही धडक कारवाई सुरूच राहणार असून, सर्वांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.”
— अतुल दहिफळे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, उरण.
