वारंवार अर्ज करूनही पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष; कार्यालयासमोर उपोषणाची तयारी
कोलाड | विश्वास निकम
मुंबई-गोवा महामार्गावरून डोलवहाळ पाटबंधारे धरणाच्या उजव्या तीराकडे जाणारा रस्ता गेल्या तीन दशकांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या पुई ग्रामस्थांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले असून, रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास कोलाड पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
खडी उखडल्याने अपघातांचे सत्र
पुई गावाच्या हद्दीतून धरणाकडे जाणाऱ्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ३० वर्षांपासून डागडुजी न झाल्याने रस्त्यावरील खडी पूर्णपणे बाहेर आली असून चालणेही कठीण झाले आहे. या मार्गाचा वापर आदिवासी वाडीतील नागरिक, शेतकरी आणि धरणावर येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र, खराब रस्त्यामुळे येथे अनेकदा छोटे-मोठे अपघात झाले असून प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
पाच वेळा अर्ज, पण प्रशासन ढिम्म
श्री क्षेत्रपाल मित्र मंडळ, पुई यांच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे विभाग (कोलाड) यांच्याकडे आतापर्यंत पाच वेळा लेखी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली असून प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. प्रशासनाच्या या ‘ढिम्म’ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जनआंदोलनाचा इशारा
रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी आता आरपारची लढाई लढण्याचे ठरवले आहे. रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास पाटबंधारे खात्याच्या कार्यालयासमोर जनआंदोलन आणि उपोषण करण्यात येईल, असे लेखी निवेदन ‘श्री क्षेत्रपाल मित्र मंडळा’तर्फे देण्यात आले आहे.
यावेळी पुई गाव कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत फाटे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन दिसले, समीर पडवळ, चंद्रकांत दळवी, हरिश्चंद्र कदम, अजित लहाने, दिनकर सानप यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
