नूतन कार्यकारिणी जाहीर; ६ जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
माणगाव | प्रतिनिधी
आपल्या सामाजिक कार्यामुळे रायगड जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या माणगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सलीम मुबारक शेख यांची सलग दहाव्यांदा एकमताने आणि बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बिनविरोध निवड आणि नवीन कार्यकारिणी
नववर्षाच्या मुहूर्तावर गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह माणगाव येथे पत्रकार संघाची महत्त्वाची सभा पार पडली. या सभेत सन २०२६ या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली. यामध्ये अनुभवी नेतृत्व म्हणून सलीम शेख यांच्यावर पुन्हा एकदा धुरा सोपवण्यात आली आहे.
निवड झालेली नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
- अध्यक्ष: सलीम शेख
- कार्याध्यक्ष: मजीद हाजिते
- उपाध्यक्ष: आजेश नाडकर, प्रभाकर मसुरे
- सचिव: स्वप्ना साळुंके
- सहसचिव: सिद्धी दाखिणकर
- खजिनदार: सुप्रिया शिंदे
- प्रवक्ता: सचिन देसाई
- प्रसिद्धी प्रमुख: संतोष गायकवाड
मार्गदर्शक/सल्लागार: विजयशेठ मेहता (ज्येष्ठ मार्गदर्शक), ॲड. केदार गांधी (कायदेशीर सल्लागार), सुभाष दळवी, निलेश म्हात्रे, मंगेश पोळेकर.
सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेणार – सलीम शेख
निवडीनंतर बोलताना सलीम शेख यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “गेल्या नऊ वर्षांपासून आपला संघ औषध व फळवाटप, महारक्तदान शिबिर आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव असे उपक्रम राबवत आहे. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल.”
६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा होणार
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार दिनाचे औचित्य साधून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना औषध व फळवाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्षांनी केले आहे. याशिवाय नवनवीन समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
