उरण नगरपालिकेत सत्ताबदल; महाविकास आघाडीच्या विजयाने राजकीय समीकरणे बदलली
उरण | प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे उरण नगरपालिकेवर अबाधित राहिलेली भाजपची सत्ता उलथवून लावत ‘जायंट किलर’ ठरलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. भावना घाणेकर यांचा उरण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. केंद्रात, राज्यात आणि स्थानिक पातळीवरही भाजपची सत्ता असताना जनतेने दिलेला हा कौल उरणच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या ‘गर्वा’ला मतदारांचा धक्का
या निवडणुकीत भाजपने आपली सत्ता कायम राखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र, महाविकास आघाडीने एकजुटीने रणशिंग फुंकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस सौ. भावना घाणेकर यांना रिंगणात उतरवले. प्रचारादरम्यान सत्ताधाऱ्यांच्या कथित भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचा पर्दाफाश केल्याने मतदारांनी ‘बदल’ स्वीकारत भाजपच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावला.
अटीतटीच्या लढतीत निर्णायक विजय
मतमोजणीच्या दिवशी पहिल्या फेरीपासूनच सौ. भावना घाणेकर यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. या ऐतिहासिक विजयासोबतच महाविकास आघाडीचे ९ नगरसेवक निवडून आल्याने नगरपालिकेत सत्तांतराची मुहूर्तमेढ रोवली गेली. भाजपचा बालेकिल्ला हादरवून सोडणाऱ्या या विजयामुळे राजकीय समीक्षकांनी घाणेकर यांना ‘जायंट किलर’ ही उपाधी दिली आहे.
पत्रकार संघाकडून गौरव
या विजयाच्या पार्श्वभूमीवर उरण नगरपालिका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पत्रकार संघातर्फे सौ. घाणेकर यांचा सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “जनतेने दिलेला कौल हा केवळ सत्तेचा नव्हे, तर बदलाचा आहे. उरणच्या विकासासाठी केवळ घोषणा न करता ठोस कृती करून जनतेचा विश्वास सार्थ ठरेल. या कामात पत्रकारांची सजग भूमिका महत्त्वाची असेल.”
या गौरव सोहळ्याला उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, उपाध्यक्ष वीरेश मोडखरकर, दिलीप कडू, चिटणीस अजित पाटील यांच्यासह अन्य सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
