स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नागोठणे पोलिसांची संयुक्त कारवाई; आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी
नागोठणे | नितीन गायकवाड
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि नागोठणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मध्य प्रदेशातील एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे लावला छडा
नागोठणे पोलीस ठाण्यात २ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा क्र. १८७/२५ आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा क्र. १८८/२५ असे घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्र फिरवून आरोपीचा माग काढला.
मध्य प्रदेशातून आवळल्या मुसक्या
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड पोलिसांनी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील कुक्षी तालुक्यात सापळा रचला. तेथील ‘गेट्टा’ या गावातून कुलदीप राधेश्याम डोडवे (वय २२ वर्ष) याला मोठ्या कौशल्याने ताब्यात घेण्यात आले. ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:०४ वाजता त्याला रीतसर अटक करण्यात आली.
गुन्ह्यांची दिली कबुली
अटक केल्यानंतर आरोपीची सखोल चौकशी केली असता, त्याने नागोठणे येथील दोन्ही घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३)(४) अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
न्यायालयीन कोठडी आणि पुढील तपास
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यात अन्य कोणाचे सहकार्य लाभले आहे का किंवा आरोपीने आणखी कुठे चोरी केली आहे का, याचा अधिक तपास नागोठणे पोलीस करत आहेत.
