अलिबाग | प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने अलिबाग येथे ‘उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था’ व ‘माणुसकी प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. अलिबाग एस.टी. डेपो परिसरातील गणपती मंदिराजवळ ३१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या शिबिरात सुमारे १०० कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा
या शिबिरामध्ये ‘उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना’ (पिंपळभाट) येथील डॉ. मंजिरी पाटील, सिस्टर रुचिता कदम आणि अंकुश चंदनशिव यांनी आपली सेवा बजावली. शिबिरात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ती औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली. वर्षाच्या शेवटच्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या शिबिराप्रसंगी आगार व्यवस्थापक राकेश देवरे, प्रभारक शिवराज जाधव आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रमोद अनमाने प्रामुख्याने उपस्थित होते. “धावपळीच्या जीवनात एसटी कर्मचारी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, अशा वेळी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आहे,” अशा शब्दांत आगार व्यवस्थापकांनी आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. उज्ज्वला चंदनशिव, डॉ. राजाराम हूलवान आणि डॉ. नितीन गांधी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून राबविण्यात आलेल्या या शिबिराबद्दल लाभार्थी कर्मचारी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
