पेण | विनायक पाटील
पनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्वांगीण विकासाची आणि जनतेच्या विश्वासाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून भाजपाच्या उमेदवार ममता प्रितम म्हात्रे यांची नगरसेविका पदी बिनविरोध निवड झाली असून, या निवडीमुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात उत्साहाचे वातावरण आहे.
विकासाच्या घोडदौडीची पोचपावती
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भाजपने राबविलेल्या जनहितार्थ योजना आणि विकासकामांच्या जोरावर ही बिनविरोध निवड झाली असल्याचे बोलले जात आहे. ही केवळ एका पदाची निवड नसून, जनतेने आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर दाखवलेला हा दृढ विश्वास असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे. ममता म्हात्रे यांच्या रूपाने प्रभागाला एक अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
या यशस्वी निवडीनंतर पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे. “ममता म्हात्रे यांची बिनविरोध निवड ही पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांची पोचपावती आहे. त्यांच्यासह पनवेल महानगरपालिकेत बिनविरोध निवडून आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील जनसेवेच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देतो,” असे प्रतिपादन प्रितम म्हात्रे यांनी केले.
भाजपच्या या यशामुळे आगामी काळात पनवेलमधील विकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
