• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ताम्हिणी घाटात मृत्यूचे तांडव; एकाच दिवशी दोन भीषण अपघात, कार दरीत कोसळून सोलापूरचा तरुण ठार

ByEditor

Jan 2, 2026

माणगाव | सलीम शेख
ताम्हिणी घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून हा घाट आता पर्यकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. शुक्रवारी (२ जानेवारी) अवघ्या चार तासांच्या अंतराने दोन भीषण अपघात घडले. सकाळी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाल्यानंतर, दुपारी ३:३० वाजता सोलापूर येथील एका पर्यटकाची कार ५०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, एकाच दिवसातील दोन मोठ्या अपघातांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

​५०० फूट खोल दरीत कारचा चक्काचू

​सोलापूर येथील शुभम आजबे (२८, रा. ब्रह्मपुरी तांबडी) हा तरुण आपल्या हुंदाई मारुती कारने (क्र. MH 12 YQ 2234) जात असताना कोंडेथर गावच्या हद्दीतील धोकादायक उतारावर त्याचे नियंत्रण सुटले. कार थेट ५०० फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णतः चक्काचूर झाला आणि शुभमचा मृतदेह गाडीतच अडकून पडला होता. रेस्क्यू टीमला पाचारण करून अत्यंत खडतर परिस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला.

​एकाच दिवशी दोन अपघात; प्रशासनावर संताप

​विशेष म्हणजे, याच ठिकाणी सकाळी ११:३० वाजता शिव महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांची ट्रॅव्हल्स बस डोंगराच्या कठड्याला धडकून २७ प्रवासी जखमी झाले होते. या घटनेचा पंचनामा आणि मदतकार्य सुरू असतानाच दुसऱ्या अपघाताची बातमी आल्याने प्रशासन आणि नागरिक हादरून गेले. गेल्या महिन्यात याच ठिकाणी ‘थार’ गाडी दरीत कोसळून सहा जणांचा बळी गेला होता. वारंवार अपघात होऊनही प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​असुरक्षित वळणे की प्रशासकीय दुर्लक्ष?

​कोंडेथर हद्दीतील हे वळण अत्यंत धोकादायक मानले जाते. या ठिकाणी ​मजबूत संरक्षक कठड्यांचा अभाव आहे, ​धोकादायक वळणांचे फलक किंवा रिफ्लेक्टर्स नाहीत. ​धुक्यामुळे दृश्यमानता कमी असताना वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

​ताम्हिणी घाटातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. या ठिकाणी तातडीने लोखंडी क्रॅश बॅरिअर्स बसवणे, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवणे आणि अपघातप्रवण क्षेत्रांत कायमस्वरूपी सूचना फलक लावण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!