नागरी सुविधांचा बोजवारा; अंधारासह अस्वच्छता आणि डासांच्या विळख्यात नागरिक
उरण | अनंत नारंगीकर
उरण तालुक्यातील वेगाने विकसित होणाऱ्या द्रोणागिरी नोड परिसरातील विद्युत पुरवठा सलग दोन दिवस खंडित झाल्याने रहिवाशांना भीषण अंधाराचा सामना करावा लागला. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या या वीजकोंडीमुळे महावितरण आणि सिडको प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
विकासाच्या गप्पा, पण सुविधांचा पत्ता नाही
सिडकोने द्रोणागिरी नोडमधील सेक्टर ४५ ते ५४ सह इतर परिसरात आधुनिक शहर वसवण्याचा निर्णय घेतला असून, येथे गृहप्रकल्पांची संख्या मोठी आहे. मात्र, नागरी सुविधा पुरवताना सिडको प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. या वसाहतींमध्ये सध्या उघडी गटारे, रस्त्यांवरील दुर्गंधी आणि वाढते डासांचे साम्राज्य यामुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. त्यातच दोन दिवस वीज गायब झाल्याने रहिवाशांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
प्रशासनाविरुद्ध जनक्षोभ
शुक्रवार (दि. २) आणि शनिवार (दि. ३) असे सलग दोन दिवस वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला होता. अनेक सोसायट्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. “एकीकडे औद्योगिकीकरण वाढत असताना मूलभूत सुविधांसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो, ही शरमेची बाब आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली.
पुरवठा सुरळीत, पण भीती कायम
दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे. मात्र, वारंवार खंडित होणारी वीज आणि पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा अभाव यामुळे पुन्हा असा प्रकार घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सिडको आणि महावितरणने समन्वय साधून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी द्रोणागिरीतील रहिवाशांकडून केली जात आहे.
